भारतीय क्रिकेट संघाने नुकतीच ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकली. भारतीय संघाने सलग दुसऱ्यांदा ऑस्ट्रेलियात जाऊन कसोटी मालिका जिंकण्याची किमया करून दाखवली. भारतीय संघातील खेळाडूंचे कौतुक होत असतानाच, युवा सलामीवीर पृथ्वी शॉवर सुमार कामगिरीमुळे बरीच टीका झाली होती. कारकीर्दीतील सर्वात खराब फॉर्ममधून जात असलेल्या शॉच्या मदतीसाठी एक माजी मुंबईकर धावून आला आहे. आगामी विजय हजारे ट्रॉफीआधी माजी भारतीय क्रिकेटपटू प्रवीण आमरे त्याला मार्गदर्शन करतील.
खराब फॉर्ममधून जात आहे पृथ्वी
भारताचा उदयोन्मुख सलामीवीर असलेला पृथ्वी शॉ सध्या अत्यंत खराब फॉर्ममधून जात आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात त्याला संधी देण्यात आली होती. ज्यामध्ये तो फक्त शून्य व चार धावा काढू शकला होता. त्याच्या जागी शुबमन गिलला संधी मिळाली होती. त्याआधी झालेल्या आयपीएलमध्ये देखील तो चारवेळा खाते ही खोलू शकला नव्हता. संपूर्ण हंगामात त्याला केवळ एक अर्धशतक झळकावता आले होते. यामुळे, पृथ्वीच्या फलंदाजी तंत्रावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
प्रविण आमरे करणार मार्गदर्शन
ऑस्ट्रेलियातील खराब कामगिरीमुळे शॉला इंग्लंडविरुद्धच्या आगामी मालिकेतून डच्चू देण्यात आला आहे. त्यामुळे आयपीएलमध्ये शॉ प्रतिनिधित्व करत असलेल्या दिल्ली कॅपिटल्सने प्रवीण आमरे यांना शॉला मार्गदर्शन करण्यास सांगितले आहे. आमरे दिल्ली कॅपिटल्सच्या प्रशिक्षक गटाचा भाग आहेत.
प्रवीण आमरे यांनी या बाबीचा उलगडा करताना म्हटले की, “दिल्ली फ्रॅंचाईजीने मला पृथ्वीसोबत काही काळ घालविण्यास सांगितला आहे. या काळात मी त्याच्या फलंदाजी तंत्राकडे जवळून लक्ष देईल. एअर इंडियामध्ये आम्ही एकत्र काम केल्याने आमच्यात चांगला समन्वय आहे. सध्या त्याला चांगल्या मार्गदर्शकाची गरज असल्याने मी त्याला मदत करण्यास तयार आहे. नजीकच्या काळात लाल चेंडूने क्रिकेट होणार नसल्याने पांढरा चेंडूने आम्ही त्याचा सराव घेत आहोत. तो मुंबई संघाकडून विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत सहभागी होण्याआधी जो वेळ शिल्लक आहे, त्याचा आम्ही सदुपयोग करण्याचा प्रयत्न करू.”
विजय हजारे ट्रॉफी खेळणार आहे पृथ्वी
देशांतर्गत क्रिकेटमध्ये मुंबईचे प्रतिनिधित्व करणारा पृथ्वी सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीनंतर होणाऱ्या विजय हजारे ट्रॉफीमध्ये खेळताना दिसेल. त्यानंतर होऊ घातलेल्या आयपीएलमध्ये तो दिल्ली कॅपिटलसाठी दम दाखवेल.
महत्वाच्या बातम्या:
आजच्याच दिवशी कर्टली ऍम्ब्रोज यांनी केली होती न भूतो न भविष्यती कामगिरी
वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी बांग्लादेश संघाची घोषणा, २ नवख्या खेळाडूंना मिळाली जागा
कार अपघातात मुंबई इंडियन्सच्या कायरन पोलार्डचा मृत्यू? जाणून घ्या खरं काय ते