जगातील सर्वात जुन्या क्रिकेट स्टेडियमपैकी एक आणि क्रिकेटची मक्का म्हणून ओळखले जाणारे, लॉर्ड्स क्रिकेट ग्राऊंड. लंडनमधील या मैदानाला १४० वर्षांहून अधिक काळाचा इतिहास आहे, मात्र या मैदानावर एकदाही महिला संघांचा कसोटी सामना खेळला गेला नाही. आता जुलै महिना महिला क्रिकेटच्या इतिहासात कोरला जाईल, कारण येथे इंग्लंड आणि भारत यांच्यातील एकमेव कसोटी सामना १० जुलैपासून खेळला जाणार आहे. या सामन्याआधीच भारताल एक धक्का बसला आहे.
सामन्याआधी झालेल्या पत्रकार परिषदेत, भारतीय महिला संघाचे मुख्य प्रशिक्षक अमोल मुझुमदार यांनी महत्त्वाची माहिती दिली. स्टार खेळाडू प्रतिका रावल या ऐतिहासिक कसोटीमधून बाहेर झाली आहे. त्यामुळे तिचे लॉर्ड्सवर खेळण्याचे स्वप्न भंगले आणि संघासाठी हा एक प्रकारचा धक्काच आहे.
प्रतिकाला टॉंटनमध्ये इंग्लंड अ संघाविरुद्धच्या भारत अ संघाच्या दुसऱ्या वनडे सामन्यादरम्यान दुखापत झाली. तिच्या उजव्या गुडघ्याला जखम झाली असून ती इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यासाठी वेळेवर बरी न होऊ शकल्याने तिला वगळण्यात आले आहे.
निवड समितीने प्रतिकाच्या जागी प्रिया पुनियाची निवड केली आहे. प्रियाने नुकत्याच पार पडलेल्या इंग्लंड अ विरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत १७१ धावा केल्या. या भारत अ संघाकडून सर्वाधिक धावा ठरल्या. तिच्या या कामगिरीमुळे भारताने ती मालिका २-१ अशी जिंकली.
(Priya Punia replaces injured Pratika Rawal in India’s squad for England Test at Lord’s)
कसोटीमध्ये भारताचे वर्चस्व
भारत आणि इंग्लंड महिला संघांमधील कसोटी क्रिकेटचा इतिहास खूपच रंजक आहे. दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत १४ कसोटी सामने खेळले गेले आहेत. यामधील भारताने तीन सामने जिंकले, तर एक सामना गमावला आहे. दहा सामने अनिर्णीत राहिले.
दोन्ही संघांमध्ये शेवटचा कसोटी सामना २०२३ मध्ये खेळला गेला. त्यामध्ये भारताने इंग्लंडला ३४७ धावांनी पराभूत केले होते. तसेच इंग्लंडच्या भूमीवर भारताचा शेवटचा कसोटी विजय २०१४ मध्ये झाला होता.
इंग्लंडविरुद्धच्या कसोटीसाठी भारताचा सुधारीत संघ –
हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (व्हीसी), शफाली वर्मा, जेमिमाह रॉड्रिग्स, दीप्ती शर्मा, ऋचा घोष (विकेटकीपर), श्री चरणी, यास्तिका भाटिया (विकेटकीपर), नंदनी शर्मा, हरलीन देओल, रेणुका ठाकूर, क्रांती गौड, सायली सातघरे, स्नेह राणा आणि प्रिया पुनिया.






