जगातील सर्वात मोठी व्यावसायिक कबड्डी लीग असलेल्या प्रो कबड्डी लीगच्या नवव्या हंगामात बुधवारी (12 ऑक्टोबर) दोन सामने खेळले गेले. दिवसातील पहिल्या सामन्यात बंगाल वॉरियर्सने बेंगलोर बुल्सचा 42-33 असा तर दुसऱ्या सामन्यात गतविजेता दबंग दिल्लीने स्वप्नवत पुनरागमन करत युपीचा 44-42 असा पराभव केला. बंगालच्या विजयात महाराष्ट्राच्या खेळाडूंनी चमकदार कामगिरी करून दाखवली.
दिवसातील पहिल्या सामन्यात बेंगलोर बुल्स आणि बंगाल वारियर्स हे संघ आमने-सामने आले. विजयाचे दावेदार असलेल्या बेंगलोरला सुरुवात चांगली मिळाली. मात्र, भरत व कर्णधार विकास कंडोला यांच्या व्यतिरिक्त इतर खेळाडूंनी निराशा केली. बंगालसाठी कर्णधार मनिंदर सिंगने सुपर टेन लगावला. त्याला महाराष्ट्राच्या श्रीकांत जाधव, गिरीश एर्नाक, शुभम शिंदे व वैभव गर्जे यांनी साथ दिली.
A complete team effort from the Warriors helps them secure their second win of the season 🐅 💪#vivoProKabaddi #FantasticPanga #BLRvBEN pic.twitter.com/9dUkYZBxQj
— ProKabaddi (@ProKabaddi) October 12, 2022
दिवसातील दुसऱ्या सामन्यात गतविजेता दबंग दिल्ली आणि युपी योद्धाज समोरासमोर आले. सुरेंदर गिल व परदीप नरवाल यांच्या धडाकेबाज कामगिरीमुळे युपीने पहिल्या सत्रात 25-15 अशी आघाडी घेतली. दुसऱ्या सत्रात दिल्लीने गुणांचा अक्षरशः धडाका लावला. नवीन कुमार व मनजित या रेडरसह डिफेंडर्सने शानदार खेळ केला. त्यांनी अखेरच्या मिनिटात संयमाने खेळ दाखवत 44-42 असा विजय संपादन केला. दिल्लीचा हा स्पर्धेतील सलग तिसरा विजय आहे.