प्रो कबड्डी लीगच्या अठराव्या दिवशी दोन सामने रंगले. दुसऱ्या सामन्यात युपी योद्धा व बेंगलोर बुल्स हे तुल्यबळ संघ भिडले. सुरुवातीला पिछाडीवर असतानाही यूपी संघाने दमदार पुनरागमन करत हा सामना ४२-२७ असा आपल्या नावे केला.
पहिल्या हाफची सुरुवात अत्यंत संथ झाली. परदीप नरवाल व पवन सहरावत आपल्यास संघांसाठी काहीही विशेष कामगिरी करू शकलो. यूपीच्या प्रशिक्षकांनी परदीप नरवालला बाहेर देखील केले. यूपी संघ ऑल आउट होण्याच्या मार्गावर असताना त्यांच्या डिफेंडर्सनी तब्बल सहा गुण घेत संघाला आघाडीवर नेले. पहिल्या हाफच्या अखेरीस यूपी संघाकडे १९-१४ अशी आघाडी होती.
दुसऱ्या हाफच्या सुरुवातीला यूपी संघाने बेंगलोरला ऑल आउट करत आघाडी वाढवली. त्यानंतर रेडींगमध्ये श्रीकांत जाधव याने सुपर टेन घेत चांगल्या स्थितीत आणले. पवन सेहरावतला तब्बल तीन वेळा सुपर टॅकल करत यूपी संघाने आपला विजय जवळपास निश्चित केला. यूपी संघाने डिफेन्समध्ये तब्बल २२ गुण मिळवले. कर्णधार पवन सेहरावतचे अपयश बेंगलोरच्या पराभवाचे प्रमुख कारण ठरले.






