---Advertisement---

प्रो कबड्डी: नवीनच्या अचाट कामगिरीने दिल्ली पुन्हा दबंग! थलाईवाजचाही पहिला विजय

On: सोमवार, ऑक्टोबर 17, 2022 9:41 PM
---Advertisement---

प्रो कबड्डी लीगच्या नवव्या हंगामात सोमवारी (17 ऑक्टोबर) दोन सामने खेळले गेले. दिवसातील पहिल्या सामन्यात तमिल थलायवाज व पटना पायरेट्स या संघाचा आमनासामना झाला. तमिल थलाईवाजने 33-32 असा सामना जिंकत हंगामातील पहिला विजय मिळवला. दिवसातील दुसऱ्या सामन्यात दबंग दिल्ली व हरियाणा स्टीलर्स या उत्तरेकडील संघांदरम्यान झालेल्या सामन्यात नवीनने अखेरच्या रेडमध्ये मिळवलेल्या दोन गुणांमुळे दिल्लीने 38-36 असा विजय मिळवला.

https://twitter.com/ProKabaddi/status/1582024595548557312?t=2E48Pv9nxK27zCBDRmqUBg&s=19

 

दिवसातील पहिल्या सामन्यात स्पर्धेतील आपला पहिला विजय शोधत असलेल्या तमिल थलायवाज व पटना पायरेट्स या संघांचा सामना झाला. दोन्ही संघ विजयाच्या इराद्याने सामन्यात उतरले. तमिल संघासाठी हिमांशू आणि नरेंद्र या दोन्ही युवा रेडर्सने शानदार खेळ केला. पहिला हाफमध्ये त्यांच्याकडे दोन गुणांची आघाडी होती. पटना संघासाठी अष्टपैलू रोहित गुलिया सातत्यपूर्ण कामगिरी करत राहिला. त्याला सचिन तंवर याने साथ दिली. अखेरच्या काही मिनिटांमध्ये दोन्ही संघांमध्ये विजयासाठी जोरदार संघर्ष पाहायला मिळाला. मात्र, योग्य वेळी संयम दाखवत तमिल थलाईवाजने 33-32 असा अवघ्या एका गुणाने विजय संपादन केला.

दिवसातील दुसऱ्या सामन्यात सलग चार विजय मिळवत पहिल्या स्थानी असलेल्या दबंग दिल्ली संघाचा सामना हरियाणा स्टीलर्सशी झाला. नवीन कुमारच्या नेतृत्वातील दिल्लीने या सामन्यात देखील वेगवान सुरुवात केली. हरियाणा संघासाठी मीतू व मनजीत यांनी सातत्याने गुण घेतले. दिल्लीसाठी एकट्या नवीनने चमकदार कामगिरी केली. पहिल्या सत्राच्या समाप्तीपर्यंत दिल्लीने 17-12 अशी महत्वपूर्ण आघाडी मिळवली होती. त्यानंतर हरियाणा संघाने पुनरागमन करत दिल्लीवर आघाडी मिळवली. परंतु, नवीनने पुन्हा एकदा अप्रतिम खेळ दाखवत दोन मिनिट शिल्लक असताना संघाला आघाडीवर नेले. अखेरचा रेडपर्यंत रोमहर्षक झालेल्या या सामन्यात दिल्लीने 38-36 असा विजय मिळवला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---