प्रो कबड्डी लीगच्या पंधराव्या हंगामातील १२६ व्या सामन्यात पहिल्या दोन क्रमांकावरील पटना पायरेट्स व दबंग दिल्ली हे संघ आमनेसामने आले. आपल्या राखीव खेळाडूंसह मैदानात उतरलेल्या पटना पायरेट्सने या सामन्यातही दिमाखदार खेळ केला. दिल्लीने २६-२३ असा विजय मिळवत प्लेऑफसाठी क्वालिफाय केले.
यापूर्वीच पहिल्या क्वालिफायरमध्ये स्थान मिळवलेल्या पटनाने या सामन्यात आपल्या प्रथम पसंतीच्या रेडर्सला विश्रांती त्याचवेळी प्ले ऑफमध्ये स्थान मिळवण्यासाठी दिल्लीला या सामन्यात विजय मिळवायचा होता. नवीन कुमारच्या आगमनाने दिल्ली संघ या सामन्यात मजबूत भासत होता. मात्र, पटना च्या संघाने त्यांना तोडीस तोड खेळ दाखवला. दिल्लीकडे पहिल्या हाफच्या अखेरीस १४-१३ अशी नाममात्र आघाडी होती.
दुसऱ्या हाफमध्येही पटनाने दिल्लीला चांगले झुंजविले. पहिल्या दहा मिनिटात दोन्ही संघांनी एकसारखा खेळ केला. अखेर नऊ मिनिटात दिल्लीकडे केवळ एका गुणाची आघाडी होती. अगदी पहिल्या मिनिटापासून अटीतटीचा झालेला हा सामना अखेरच्या रेड पर्यंत रंगला. पटना संघाने अखेरच्या दोन मिनिटात पुन्हा अत्यंत युवा खेळाडूंना संधी दिली. मात्र, मंजीत छिल्लरने अखेरपर्यंत आपला अनुभव पणाला लावत संघाला २६-२३ असा विजय मिळवून देत प्ले ऑफ मध्ये स्थान पक्के केले.