बेंगलोर येथे सुरू असलेल्या प्रो कबड्डी लीगच्या ४६ व्या सामन्यात अव्वल क्रमांकावरील दबंग दिल्ली व जयपूर पिंक पँथर्स हे संघ समोरासमोर आले. असंख्य चढ-उतार आलेल्या या सामन्यात अखेरीस जयपुर संघ ३०-२८ असा विजय मिळवण्यात यशस्वी ठरला.
तुल्यबळ संघातील हा सामना अतिशय संथ सुरु झाला. नवीन कुमार व अर्जुन देशवाल या प्रतिस्पर्धी रेडरने पहिल्या हाफमध्ये अनुक्रमे ३ व ४ गुण मिळवले. मध्यंतराला सामना १२-१२ असा बरोबरीत उभा होता.
दुसऱ्या हाफच्या सुरुवातीपासूनच दिल्लीने वेगवान गुण घेण्यास सुरुवात केली. नवीनने यादरम्यान कारकिर्दीतील ६०० रेडींग पॉइंट मिळवले. नवीन प्रो कबड्डीमध्ये सर्वात वेगवान ६०० पॉईंट घेणारा रेडर ठरला. दुसरीकडे अर्जुन व दीपक हुडा यांनी दिल्लीला मोठी आघाडी घेण्यापासून वंचित ठेवले. दीपकनेही या दरम्यान ९०० रेडींग पॉईंट आपल्या नावे केले
दिल्लीचा युवा रेडर आशुने ६ गुण घेत संघाला आघाडीवर नेले. मात्र, दीपक हूडाने दोन गुण घेत दिल्लीला ऑल आउट करत एका गुणाची आघाडी घेतली. नवीन सामन्याची दोन मिनिटे शिल्लक असताना बाद झाला. त्यानंतर जयपुरसाठी कर्णधार संदीप धूलने आशुला बाहेर करत संघाचा विजय निश्चित केला. नवीन कुमार तब्बल २८ सामन्यानंतर सुपर टेन करण्यात अपयशी ठरला.