संपुर्ण नाव- मोहम्मद अझरुद्दीन
जन्मतारिख- 8 फेब्रुवारी, 1963
जन्मस्थळ- हैद्राबाद, आंध्र प्रदेश
मुख्य संघ- भारत, डर्बिशायर आणि हैद्राबाद
फलंदाजीची शैली- उजव्या हाताचा फलंदाज
गोलंदाजीची शैली- उजव्या हाताचा मध्यमगती गोलंदाज
आंतरराष्ट्रीय कसोटी पदार्पण- भारत विरुद्ध इंग्लंड, तारिख -31 डिसेंबर,1984 ते 5 जानेवारी 1985, ठिकाण – कोलकाता
आंतरराष्ट्रीय वनडे पदार्पण- भारत विरुद्ध इंग्लंड, तारिख – 20 जानेवारी, 1985, ठिकाण – बंगळुरु
आंतरराष्ट्रीय कसोटी कारकिर्द-
फलंदाजी- सामने- 99, धावा- 6215, शतके- 22, सर्वोत्तम कामगिरी – 199 धावा
आंतरराष्ट्रीय वनडे कारकिर्द-
फलंदाजी- सामने- 334, धावा- 9378, शतके- 7, सर्वोत्तम कामगिरी – नाबाद 153 धावा
गोलंदाजी- सामने- 334, विकेट्स- 12, सर्वोत्तम कामगिरी- 3/19
थोडक्यात माहिती-
-मोहम्मद अझरुद्दीन हे भाारतीतील 90 च्या दशकातील सर्वोत्कृष्ट फलंदाज होते. एवढेच नव्हे तर, मनगटाचा अतिउत्तम वापर करत स्ट्रोक्स मारणारे ते जगातील सर्वोत्कृष्ट फलंदाज म्हणूनही ओळखले जातात.
-कसोटी कारकिर्दीची सुरुवात करताच पहिल्या तीन सामन्यात शतक करणारे ते आजपर्यंतचे एकमेव फलंदाज आहेत. त्यांनी 1984-85 मध्ये कोलकाता येथील इंग्लंडविरुद्धच्या पदार्पणाच्या कसोटीत 110, त्यानंतरच्या चेन्नईत 105 आणि कानपूर येथे 122 अशा प्रकारे 3 शतके ठोकली होती.
-1988मध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे सामन्यात त्यांनी 62 चेंडूत शतक पूर्ण केले होते. यासह त्यांनी त्यावेळेला सर्वात वेगवान शतक करण्याचा विक्रम केला होता. त्यानंतर त्यांनी त्या सामन्यात 65 चेंडूत केलेल्या नाबाद 108 धावांनी भारताला विजय मिळवण्यात सहाय्य केले होते.
-कोलकाता येथील इडन गार्डनमध्ये अझरुद्दीन यांनी दमदार विक्रम नोंदवले होते. कसोटी पदार्पणाच्या वेळी त्यांनी केलेले दमदार शतक हा त्यांचा या मैदानावरील पहिला विक्रम होता. त्यानंतर त्यांनी या मैदानावर 7 कसोटी सामने खेळले ज्यात 107.50च्या सरासरीने त्यांनी 860 धावा केल्या. यात 5 शतकांचा आणि 2 अर्धशतकांचा समावेश होता. त्यांना या मैदानावरील अवघ्या एका सामन्यात 50 हून जास्त धावा करण्यात अपयश आले होते.
-अझरुद्दीन हे एकमेव असे भारतीय कर्णधार आहेत ज्यांनी 3 विश्वचषकांमध्ये भारतीय संधाचे नेतृत्व केले आहे. 1992, 1996 आणि 1999 साली भारतीय संघाचे कर्णधारपद सांभाळले होते. कपिल देव आणि श्रीनिवास वेंकटराघवन यांनी 2 वेळा विश्वचषकात संघाचे नेतृत्व केले आहे. तर, एमएस धोनीही 2 विश्वचषकात भारताचा कर्णधार होता.
-एकूण 47 कसोटी सामन्यात अझरुद्दीन यांनी भारताचे कर्णधारपद सांभाळले होते. यापैकी 14 कसोटी सामन्यात त्यांच्या नेतृत्वाखाली भारताला विजय मिळाला होता. त्यावेळी ते सर्वाधिक कसोटी सामने जिंकणारे भारतीय कर्णधार होते. नंतर सौरव गांगुलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने 49 कसोटींपैकी 21 कसोटीत विजय मिळवल्याने अझरुद्दीन यांचा विक्रम मोडला गेला.
-शिवाय अझरुद्दीनने वनडेत 174 सामन्यात संघाचे नेतृत्व केले होते आणि 90 वेळा विजय मिळवण्याचा विक्रम केला होता. त्यांचा हा विक्रम पुढे धोनीने मोडला.
-केवळ फलंदाजीत नव्हे तर अझरुद्दीन यांनी क्षेत्ररक्षणातही चमकदार कामगिरी केली होती. त्यांनी 334 वनडे सामन्यात क्षेत्ररक्षण करताना 156 झेल झेलले होते. त्यांचा हा विक्रम पुढे श्रीलंकेचे फलंदाज महिला जयवर्धने आणि ऑस्ट्रेलियाचे फलंदाज रिकी पाँटिंग यांनी मोडला होता.
-अझरुद्दीन हे त्या क्रिकेटपटूंपैकी एक होते ज्यांनी त्यांच्या कसोटी कारकिर्दीची सुरुवात आणि शेवट शतकाने केला होता. त्यांनी पदार्पणाच्या सामन्यातच शतक केले होते. तसेच 2000मध्ये दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या शेवटच्या कसोटी सामन्यातही त्यांनी 102 धावा केल्या होत्या. ते त्यांचे कसोटीतील 22वे शतक होते.
-अझरुद्दीन यांनी प्रथम नौरीन यांच्याशी विवाह केला. त्यानंतर प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री संगिता बिजलानी यांच्यांशी लग्न केले. त्यांच्यासोबतही ते सुखाचा संसार करू शकले नाहीत.
-अझरुद्दीन यांचा मोठा मुलगा मोहम्मद असदुद्दीन याने हैद्राबाद संघाकडून वयोगटातील क्रिकेट खेळले होते. तो सध्या उत्तर प्रदेशकडून खेळतो. त्यांचा लहान मुलगा मोहम्मद अयाझुद्दीन हादेखील चांगला क्रिकेटपटू होता. मात्र, 2011मध्ये त्याचा अपघातात मृत्यू झाला.
-असदुद्दीन याने 2019 ला भारताची टेनिस स्टार सानिया मिर्झाची बहिण अनम मिर्झाशी लग्न केले आहे.
-2009मध्ये अझरुद्दीन यांनी राजकारणात पाऊल ठेवले. त्यांनी काँग्रेस पक्ष पक्षाकडून उत्तर प्रदेशमधील मोरदाबादकडून लोकसभेत विजय मिळवला होता. तर 2014मध्ये त्यांना अपयश आले होते.
-2000साली अझरुद्दीन यांना मॅच फिक्सिंग प्रकरणात पकडण्यात आल्याने आयुष्यभरासाठी क्रिकेटमधून प्रतिबंधित करण्यात आले होते.
-अझरुद्दीन यांना 1986मध्ये अर्जुन पुरस्कार आणि 1988मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
-2016मध्ये अझरुद्दीन यांच्या जीवनावर अजहर हा चित्रपट बनवण्यात आला होता. त्याची भूमिका ही अभिनेता इमरान खान यांनी केली होती.