भारताचा सर्वकालीन महान क्रिकेटपटू तसेच भारतरत्न या भारताच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित सचिन तेंडुलकर याच्या घराबाहेर आंदोलन करण्यात आले. गुरुवारी (31 ऑगस्ट) प्रहार संघटनेचे अध्यक्ष व आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वात अनेक कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केले. सचिन तेंडुलकरने भारतरत्न पुरस्कार मिळाला असतानाही गेम प्लॅटफॉर्मची जाहिरात करू नये, अशी त्यांची मागणी होती. पोलिसांनी वेळीच मध्यस्थी करत काही आंदोलकांना ताब्यात घेतले असून त्यांच्यावर वांद्रे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आमदार कडूंनी काही दिवसांपूर्वी सचिनने केलेल्या एका जाहिरातीवर आक्षेप नोंदवलेला. ऑनलाईन गेमिंगच्या या जाहिरातीमुळे सचिनला मानणारे तरुण या संपूर्ण प्रकाराकडे आकर्षिले जात असल्याचा दावा बच्चू कडू यांनी केलेला. त्यामुळे सचिनने या जाहिराती करणे बंद कराव्या अथवा त्याला देण्यात आलेला भारतरत्न पुरस्कार तरी परत करावा, अशी मागणी बच्चू कडू यांनी केली आहे.
भविष्यात हा पुरस्कार देताना त्याची मर्यादा राखली जावी अशी मागणी देखील त्यांनी केली. भारतरत्नचा जुगार रत्न होऊ नये याची काळजी घ्यावी लागेल, असे त्यांनी म्हटले. सचिनने या संपूर्ण प्रकरणावर स्पष्टीकरण न दिल्यास आगामी गणेशोत्सवात प्रत्येक गणेश मंडळाबाहेर सचिन तेंडुलकर दानपेटी ठेवण्यात येईल असा इशारा देखील त्यांनी दिला.
(Protest Outside Sachin Tendulkar House MLA Bacchu Kadu Lead)
महत्वाच्या बातम्या –
पाकिस्तानची आशिया चषकात विजयी सलामी, नवख्या नेपाळचा 238 धावांनी पराभव
“भारत-पाकिस्तान द्वंद्व ऍशेसपेक्षा सरस”, ऑसी दिग्गजाने दिली कबुली