भारतीय वरिष्ठ संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. तिथे भारतीय संघाला जागतिक कसोटी अजिंक्यपद अंतिम सामन्यानंतर इंग्लंड संघाविरुद्ध 5 कसोटी सामन्यांची मालिका खेळायची आहे. या मालिकेचा पहिला सामना 4 ऑगस्टपासून खेळला जाणार आहे. परंतु ही मालिका सुरू होण्यापूर्वी भारतीय संघाला एक धक्का बसला आहे.
तो म्हणजे भारतीय संघाचा सलामीवीर फलंदाज शुभमन गिलला दुखापतीच्या कारणामुळे इंग्लंड विरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेतून सुरूवातीच्या काही सामन्यामधून बाहेर जावे लागणार आहे. पण इतकेच नव्हे तर, दुखापतीतून लवकर बरा न झाल्यास शुभमन गिल पूर्ण मालिकेतूनच बाहेर जाण्याची शक्यता आहे.
शुभमन गिलला झालेल्या दुखापतीमुळे त्याच्या जागी पृथ्वी शॉला इंग्लंडला पाठवण्याची शक्यता आहे. पृथ्वी शॉ सध्या श्रीलंका दौर्यावर आहे. तिथे त्याला तीन एकदिवसीय मालिका आणि तीन टी-20 मालिका खेळायची आहे. टाईम्स ऑफ इंडियाला मिळालेल्या वृत्तानुसार, संघ व्यवस्थापक पृथ्वी शॉला शक्य तितक्या लवकर इंग्लंडला पाठवणार आहेत.
ऑस्ट्रेलियाच्या दौर्यावर खराब कामगिरी केल्यावर शॉला संघातून वगळण्यात आले होते. पण घरच्या मैदानावरच्या देशांतर्गत स्पर्धेत त्याने 800 पेक्षाही अधिक धावांची उत्कृष्ट कामगिरी केली आणि भारतीय संघात पुनरागमन केले. परंतु आम्ही इथे त्या 3 कारणांचा उल्लेख करणार आहोत, ज्यामुळे पृथ्वी शॉ इंग्लंडला पाठवणे अयोग्य ठरू शकते.
1) खूप काळापासून कसोटी क्रिकेट खेळला नाही पृथ्वी शॉ
मागील वर्षी ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर पृथ्वी शॉ एकाही कसोटी सामन्यात खेळू शकला नाही. त्याने सातत्याने मर्यादित षटकांचे क्रिकेट खेळले असले तरीही त्याने कसोटीत फलंदाजी केलेली नाही. अशा परिस्थितीत पृथ्वी शॉला इंग्लंडच्या कठीण परिस्थितीत कोणतीही पडताळणी न करता पाठविणे हा शहाणपणाचा निर्णय नाही. संघात उपस्थित असलेल्या मयंक अग्रवाल किंवा केएल राहुल यांना सलामीची जबाबदारी दिली गेली, तर बरे होईल.
2) मयंक अग्रवाल आणि केएल राहुलवर होईल नकारात्मक परिणाम
रोहित शर्मा आणि शुभमन गिल व्यतिरिक्त निवडकर्त्यांनी इंग्लंड दौर्याचा विचार केल्यास मयांक अग्रवाल आणि केएल राहुलचा देखील संघात समावेश केला आहे. हे दोन्ही फलंदाज सध्या इंग्लंडमध्ये आहेत आणि या दोन्ही खेळाडूंना इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संधी मिळण्याची प्रतीक्षा आहे. शुभमन गिल संघातून बाहेर पडल्यानंतर अग्रवाल आणि राहुला स्वत:ला सिद्ध करण्याची संधी मिळेल. पण जर पृथ्वी शॉला इंग्लंडमध्ये बोलावण्यात आले आणि त्याला प्रथम खेळण्यास पाठवले. तर या दोन्ही फलंदाजांच्या क्षमतेवर पुन्हा एकदा मोठा प्रश्नचिन्ह निर्माण होण्याची शक्यता आहे आणि यामुळे नकारात्मक परिणाम देखील होईल.
3) विलगिकरणामुळे पृथ्वी शॉच्या मनावर होईल परिणाम
पृथ्वी शॉ श्रीलंकेला जाण्यापूर्वी 14 दिवसांपासून विलगिकरणात ठेवण्यात आले होते आणि त्यानंतर श्रीलंकेत तीन दिवस विलगिकरणात ठेवण्यात आले होते. सतत विलगीकरणात ठेवल्यामुळे खेळाडूंवर मानसिक परिणाम होतो. त्याचा परिणाम त्यांच्या कामगिरीवरही स्पष्टपणे दिसून येतो. संघाचे व्यवस्थापकाने पृथ्वी शॉला इंग्लंडला पाठवले तर त्याला इंग्लंडमध्ये पुन्हा एकदा विलगिकरणाच्या प्रक्रियेतून जावे लागेल. ज्याचा वाईट परिणाम या खेळाडूवर होऊ शकतो. अशा परिस्थितीत याचा गांभीर्याने विचार केला पाहिजे आणि पृथ्वी शॉला इंग्लंडला पाठविले जाऊ नये.
महत्त्वाच्या बातम्या-
बीसीसीआयसाठी यंदाची दिवाळी असेल बंपर दिवाळी! आयपीएलच्या नव्या संघांची नावे येणार पुढे
टी२० विश्वचषकावेळी भारत अडचणीत असताना ‘हा’ खेळाडू घेऊ शकतो कर्णधार कोहलीची जागा