भारत आणि इंग्लंड दरम्यान 5 कसोटी सामन्यांची मालिका 4 ऑगस्टपासून ट्रेंट ब्रिज, नॉटिंगम येथे सुरू झाली आहे. या मालिकेपूर्वी
भारताचा युवा फलंदाज पृथ्वी शॉ श्रीलंकेहून इंग्लंडला पोहोचला आहे. सूर्यकुमार यादवही त्याच्यासोबत इंग्लंडला पोहोचला आहे. भारतीय संघाच्या जखमी झालेल्या खेळाडूंच्या जागी बदली खेळाडू म्हणून दोघांनाही बोलावण्यात आले आहे. परंतु त्यांना क्वारंटाईन नियमांमुळे पहिल्या कसोटीत खेळता येणार नाही. तसेच त्यांना दुसऱ्या कसोटी सामन्यालाही मुकावे लागू शकते. पण त्यानंतर त्यांचा खेळण्याचा मार्ग रिकामा होईल.
अशात जर पृथ्वीला कसोटी संघात संधी मिळाली आणि त्याने चांगली कामगिरी केली; तर अनेक वरिष्ठ खेळाडूंसाठी धोक्याची घंटा वाजेल. कोण आहेत ते 3 भारतीय खेळाडू? जाणून घेऊया.
मयांक अग्रवाल
भारत आणि इंग्लंड कसोटी मालिका सुरू होण्याच्या फक्त 2 दिवसआधी सलामीवीर मयांक अग्रवाल जखमी झाला आणि नॉटिंघम कसोटीतून बाहेर पडला. मात्र तो उर्वरित कसोटी सामन्यात खेळताना दिसू शकतो. मात्र आता पृथ्वी शॉ इंग्लंडमध्ये आल्यामुळे मयंकचे टेन्शन वाढणार आहे. कारण पृथ्वीही मयंक प्रमाणेच सलामीला फलंदाजी करू शकतो. त्याने नुकतेच श्रीलंका दौऱ्यावर दमदार प्रदर्शन केले आहे. त्यामुळे लयीत असलेल्या पृथ्वीला संघात जागा मिळू शकते आणि कसोटी संघातून मयांकला बाहेर बसावे लागू शकते.
चेतेश्वर पुजारा
ब्रॅड हॉगसारख्या दिग्गजांनाही विश्वास आहे की, भारतीय संघामध्ये चेतेश्वर पुजाराचा सर्वोत्तम बदली खेळाडू म्हणून पृथ्वी शॉ ठरू शकतो. महत्वाचे म्हणजे, पुजाराने गेल्या दोन वर्षांपासून एकही शतक झळकावलेले नाही. पुजाराने शेवटचे कसोटी शतक जानेवारी 2019 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध केले होते. अशा परिस्थितीत, क्रमांक तिनसाठी नवीन चेहऱ्यांची मागणी सातत्याने वाढत आहे. पृथ्वी शॉ ही उणीव भरुन काढू शकतो.
अजिंक्य रहाणे
अजिंक्य रहाणे हा भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार आहे. पण त्याच्या जागेला पृथ्वी शॉकडूनही धोका निर्माण होऊ शकतो. आयसीसी जागतिक कसोटी चॅम्पियनशिप अंतिम सामन्यामध्ये अजिंक्य रहाणेकडून बऱ्याच अपेक्षा होत्या, ज्या भंग पावल्या होत्या. तो पहिल्या डावात ४९ तर दुसऱ्या डावात केवळ १५ धावा करू शकला होता. रहाणेने अखेरचे शतक मेलबर्न कसोटीत झळकावले होते. अशा परिस्थितीत वरिष्ठ खेळाडूंवर जास्त अवलंबून राहणे भारतीय संघासाठी धोकादायक ठरू शकते. अशावेळी पृथ्वीसारख्या तरुण खेळाडूंची भूमिका महत्त्वाची ठरेल.
पृथ्वी शॉने डिसेंबर २०२० मध्ये ऍडलेडमध्ये शेवटचा कसोटी सामना खेळला होता. ज्यात विराट कोहलीचा संघ यजमान ऑस्ट्रेलियाविरुद्ध दुसऱ्या डावात ३६ धावांवर सर्वबाद झाला होता. त्यानंतर पृथ्वीला कसोटी क्रिकेटमध्ये पुनरागमन करता आले नाही. पण देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्याच्या प्रभावी कामगिरीनंतर त्याला पुन्हा एकदा भारतीय कसोटी संघात स्थान देण्यात आले आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
“त्याला बाद केले तरी मला फरक पडणार नाही”, जेम्स अँडरसनचे भारतीय कर्णधाराबाबत वक्तव्य
रूटने नाणेफेक जिंकली अन् विराटचा नावे झाला नकोसा विक्रम, धोनीलाही टाकलंय मागे
“मला खात्री आहे, विराट भैय्या भारताला इंग्लंडमध्ये मालिका जिंकून देईल”