ऑस्ट्रेलियाचा फलंदाज मार्नस लॅबुशेन २०२६ च्या पाकिस्तान सुपर लीगमध्ये (PSL) पदार्पण करण्यास सज्ज झाला आहे त्याला त्याच्या पहिल्याच हंगामापासून कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. हैदराबाद किंग्समॅन फ्रँचायझीने त्याला कर्णधार म्हणून नियुक्त करण्याच्या घेतलेल्या निर्णयामुळे क्रिकेट चाहत्यांमध्ये मोठी चर्चा सुरू झाली आहे; याचे मुख्य कारण म्हणजे मार्नस लॅबुशेनकडे टी२० क्रिकेटचा अनुभव अत्यंत मर्यादित आहे. त्याने आतापर्यंत केवळ ‘बिग बॅश लीग’ आणि इंग्लंडच्या ‘टी२० ब्लास्ट’ स्पर्धेत सहभाग घेतला आहे; आंतरराष्ट्रीय टी२० स्तरावर, त्याच्या नावावर केवळ एका सामन्याचा अनुभव जमा आहे.
आजवर, मार्नस लॅबुशेनने ५५ टी२० सामने खेळले असून, त्यात त्याने २६.५ च्या सरासरीने १,३८१ धावा केल्या आहेत आणि १२६.५ चा स्ट्राईक रेट आहे. ज्यात त्याने ८ अर्धशतकेही नोंदवली आहेत. मात्र, आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यांमध्ये त्याने केवळ २ धावा केल्या आहेत. याउलट, कसोटी क्रिकेटमध्ये लॅबुशेनने ६३ सामने खेळले असून, त्यात त्याने ४४ पेक्षा अधिकच्या सरासरीने ४,६९४ धावा कुटल्या आहेत; यात ११ शतकांचा समावेश आहे. एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याने १,८७१ धावा केल्या आहेत, ज्यात २ शतके आणि १२ अर्धशतकांचा समावेश आहे.
संघात ग्लेन मॅक्सवेलसारखा अनुभवी आणि स्टार फलंदाज उपस्थित असूनही, हैदराबाद किंग्समॅन फ्रँचायझीने मार्नसवर विश्वास दर्शवला आहे. कदाचित मॅक्सवेल संपूर्ण स्पर्धेसाठी खेळण्यास उपलब्ध नसेल, या कारणामुळे लॅबुशेनकडे कर्णधारपद सोपवण्यात आले असावे. लॅबुशेनने मात्र, आपण संपूर्ण स्पर्धेदरम्यान खेळण्यासाठी उपलब्ध असू, अशी खात्री दिली आहे.
हैदराबाद किंग्समॅनचा संघ : मार्नस लाबुशेन (कर्णधार), सैम अय्यूब, आकिफ जावेद, माज सदाकत, ग्लेन मॅक्सवेल, उस्मान खान, मोहम्मद अली, कुसल परेरा, मुहम्मद इरफान खान, हसन खान, शयान जहांगीर, बार्टमॅन, हम्माद आजम, राइली मॅरिडिथ, शरजील खान, आसिफ महमूद, हुनैन शाह, रिजवान महमूद, साद अली आणि तैय्यब आरिफ.






