पुणे: पुणे शहर संघाने पुणे जिल्हा मिनी फुटबॉल संघटनेच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय मिनी फुटबॉल स्पर्धेत १७ वर्षांखालील मुलांच्या गटातून अंतिम फेरी गाठली.
मुकुंदनगर येथील महाराष्ट्रीय मंडळाच्या चंद्रशेखर आगाशे कॉलेजच्या मैदानावर ही स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेतील १७ वर्षांखालील मुलांच्या उपांत्य फेरीच्या लढतीत पुणे शहर संघाने नाशिक संघाचा १-०ने पराभव केला.
यात पुणे संघाकडून दुसºया मिनिटाला रोडियन पुयाने केलेला गोल निर्णायक ठरला. आता पुणे शहर संघाची विजेतेपदासाठी साताराविरुद्ध लढत होईल. सातारा संघाने दुसºया उपांत्य लढतीत लातूर संघावर १-०ने मात केली.
सिद्धी बरगे याने पाचव्या मिनिटाला गोल करून सातारा संघाला आघाडी मिळवून दिली. ही आघाडी शेवटपर्यंत कायम राखून सातारा संघाने अंतिम फेरी गाठली.
१४ वर्षांखालील गटात पुणे जिल्ह्याचा पराभव
स्पर्धेतील १४ वर्षांखालील मुलांच्या गटातून पुणे जिल्हा संघाला अंतिम फेरी गाठण्यात यश आले नाही. उपांत्य फेरीत कोल्हापूर जिल्हा संघ आणि पुणे जिल्हा संघ यांच्यातील लढत निर्धारित वेळेत ०-० बरोबरीत सुटली. यानंतर शूटआउटचा अवलंब करण्यात आला.
यात कोल्हापूरकडून फरान मकानदारने गोल केला, तर सोयम हवालदार आणि आदित्य देशमुख यांनी गोल करण्याची संधी वाया घालवली. पुण्याच्या श्लोक रामटेक, तनीष जैन आणि हर्षल अगरवाल यांना गोल करण्यात अपयश आले.
आता कोल्हापूर संघाची विजेतेपदासाठी लातूर शहर विरुद्ध लढत होईल. लातूरच्या संघाने पिंपरी-चिंचवड संघाचा पेनल्टी शूटआउटमध्ये १-०ने पराभव केला. निर्धारित वेळेत लढत ०-० बरोबरी सुटली. यात शूटआउटमध्ये लातूरकडून अमान शेखने गोल केला.
तत्पूर्वी, अ गटातील पहिल्या लढतीत पुणे जिल्हा संघाने नाशिक जिल्हा संघावर १-०ने मात केली होती. पुणे संघाकडून श्लोक रामटेकने चौथ्या मिनिटाला केलेला गोल निर्णायक ठरला. नाशिक संघाला शेवटपर्यंत बरोबरी साधता आली नाही.
यानंतर पुणे जिल्हा संघाने पिंपरी-चिंचवड संघावर २-०ने मात केली. पिंपरी-चिंचवडकडून दुसºयाच मिनिटाला स्वयंगोल झाला. यानंतर रजनसिंगने पाचव्या मिनिटाला गोल करून पुणे जिल्हा संघाला विजय मिळवून दिला.
१२ वर्षांखालील गटात पुणे जिल्हा-पालघर अंतिम लढत
स्पर्धेतील १२ वर्षांखालील मुलांची अंतिम लढत पुणे जिल्हा आणि पालघर यांच्यात होणार आहे. यातील पहिल्या उपांत्य लढतीत पालघर संघाने लातूर अ संघावर २-०ने मात केली.
पालघरकडून क्रिश जयस्वाल (४, ८ मि.) याने दोन गोल केले. दुसºया उपांत्य लढतीत पुणे जिल्हा संघाने नवी मुंबई संघावर पेनल्टी शूटआउटमध्ये १-०ने मात केली.
ही लढत निर्धारित वेळेत ०-० बरोबरीत सुटली होती. शूटआउटमध्ये पुणे संघाकडून हर्षल पाटीलला गोल करण्यात यश आले, तर आदित्य गंगे आणि अभिनव यांना गोल करण्यात अपयश आले. नवी मुंबई संघाकडून मितेश राणे, वीर चौताने, गांधार माजकर यांना गोल करता आला नाही.
गटातील लढतींचे निकाल:
१४ वर्षांखालील मुले – १) मुंबई उपनगर – ० बरोबरी वि. नाशिक शहर – ०. २) मुंबई उपनगर – ९ (ध्रुव सिधानिया १, २, ४, ५ मि., दिव्यान शिरान २, ३, ६, ७, ८ मि., वि. वि. कोल्हापूर शहर- ०. ३) नाशिक जिल्हा – २ (रिदिज्ञा ३ मि., साहिल ७ मि.) वि. वि. लातूर जिल्हा – ०.
१९ वर्षांखालील मुली – १) मुंबई उपनगर -१ (राखी सावंत ३ मि.) वि. वि. पुणे जिल्हा – ०. २) पुणे शहर – ३ (श्रद्धा साळुंके ३, ४, ६ मि.) वि. वि. कोल्हापूर – ०. ३) मुंबई उपनगर -२ (राणी धनावडे ३ मि., लियान फर्नांडिस – ६ मि.) – वि. वि. कोल्हापूर – ०. ४) कोल्हापूर – ० बरोबरी वि. पुणे जिल्हा – ०.
महत्त्वाच्या बातम्या:
–पाचवी कसोटी: तिसरा दिवस फलंदाजांनी गाजवला; भारताकडून जडेजा, विहारीचे अर्धशतक
–पदार्पणातच अर्धशतक करणारा हनुमा विहारी द्रविड, गांगुलीच्या यादीत सामील
–दिग्गज क्रिकेटपटू अॅलिस्टर कूकने शेवटच्या सामन्यासाठी केला भुयारी रेल्वेने प्रवास








