वेस्ट इंडिजचा क्रिकेटपटू निकोलस पूरन याला त्याच्या विस्फोटक फलंदाजीसाठी ओळखले जाते. आयपीएलमध्ये पंजाब किंग्ज संघाचे प्रतिनिधित्त्व करत असलेल्या या शिलेदाराची बॅट गतवर्षी चांगलीच तळपली होती. परंतु यंदा त्याच्या फलंदाजीला सुरुंग लागला. कारण संधी मिळूनही पुरन एकाही सामन्यात अवघ्या २० धावांचा आकडाही गाठू शकला नाही. त्यातही तब्बल ४ वेळा तो भोपळाही न फोडता माघारी परतला. आता स्वत: पुरनने आयपीएल २०२१ मधील आपल्या निराशाजनक प्रदर्शनाबद्दल प्रतिक्रिया दिली आहे.
या फोटोला आठवणीत ठेवेल आणि स्वतला प्रेरित करेल
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आयपीएलचा चौदावा हंगाम स्थगित झाला आहे. यानंतर गुरुवारी (०६ मे) आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर पुरनने एक ट्विट केले आहे. यामध्ये कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध झालेल्या सामन्यात आपण त्रिफळाचीत होतोनाचा एक फोटो त्याने जोडला आहे. त्याखाली आयपीएल २०२१ मधील सहा सामन्यातील त्याची धावसंख्या दिली गेली आहे. इएसपीएन क्रिकइंफोने एडिट केलेला हा फोटो आहे.
या फोटोवर कॅप्शन देत त्याने लिहिले आहे की, ‘आयपीएल २०२१ स्पर्धा स्थगित होणे आणि त्यामागील कारण हृद्य तोडणारे होते. परंतु हा निर्णय घेणे आवश्यक होते. लवकरच भेटूयात आयपीएल. पुनरागमन करण्यापुर्वी मी या फोटोला माझ्या डोक्यात ठेवेल आणि याद्वारे शानदार पुनरागमन करण्यासाठी स्वत:ला प्रेरित करेल.’
The suspension of the tournament and the reasons behind it are heart breaking, but neccessary. See you soon IPL!
In the meantime I'll be using this picture as my motivation to come back stronger than ever. Keep safe everyone. pic.twitter.com/NS0SyliX5i
— NickyP (@nicholas_47) May 6, 2021
आयपीएल २०२१ मध्ये निराशाजनक कामगिरी
पंजाब किंग्ज संघाने पुरनवर विश्वास दाखवत त्याला हंगामातील पहिल्या सामन्यापासून संधी दिली होती. परंतु तो संघाच्या अपेक्षांवर खरा उतरु शकला नाही. आयपीएल स्थगित होण्यापुर्वी ७ सामने खेळताना त्याने केवळ २८ धावा केल्या. दरम्यान १९ धावा ही त्याची सर्वोच्च खेळी राहिली तर तब्बल ४ वेळा तो शून्य धावेवर बाद झाला. त्यातही राजस्थान रॉयल्सविरुद्ध त्याने गोल्डन डक (एक चेंडू खेळून बाद), चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध सिल्वर डक (दोन चेंडू खेळून बाद) आणि सनरायझर्स हैदराबादविरुद्ध डायमंड डकचा (एकाही चेंडूचा सामना न करता) नोंदवला आहे.
आयपीएल २०२० मध्ये १४ सामन्यात ३५३ धावा करणारा हा शिलेदार पुन्हा आयपीएल २०२१ चा हंगाम सुरू झाल्यावर दमदार पुनरागमन करु शकेल का नाही?, हे पाहावे लागेल.