कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना देखील बीसीसीआयने आयपीएल २०२१ स्पर्धा भारतातच खेळवण्याचा निर्णय घेतला होता. पहिला टप्पा यशस्वीरित्या पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात कोरोनाचा शिरकाव झाला होता. सुरुवातीला कोलकाता नाईट रायडर्स संघातील २ खेळाडू आणि त्यांनतर वृद्धिमान सहाला कोरोनाची लागण झाल्यामुळे ४ मे रोजी आयपीएल स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आली.
या निर्णयानंतर हंगामातील आगामी सामन्यांद्वारे आपल्याला संधी मिळण्याच्या प्रतिक्षेत असणाऱ्या क्रिकेटपटूंच्या स्वप्नाचा चुराडा झाला आहे. त्यातही एक असा क्रिकेटपटू आहे, ज्याच्या हाती यंदा फक्त निराशाच आली आहे. एकीकडे ७ वर्षांनंतर आयपीएल खेळण्याचा आनंद तर दुसरीकडे एकही सामना खेळायला न मिळाल्याचे दुःख. हा दुर्देवी क्रिकेटपटू दुसरा कोणी नसुन चेतेश्वर पुजारा आहे.
चेतेश्वर पुजाराला आयपीएल २०२१ स्पर्धेसाठी झालेल्या लिलावात चेन्नई सुपर किंग्जने आपल्या संघात स्थान दिले होते. त्याला आपल्या संघात स्थान दिल्यानंतर चेन्नई सुपर किंग्ज संघावर कौतुकाचा वर्षाव करण्यात आला होता. चेन्नईचे संघ मालक एन श्रीनिवासन म्हणाले होते की, “आम्हाला असे नाही वाटत की, राष्ट्रीय संघासाठी उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूने अनसोल्ड रहावे.”
लिलाव होण्यापूर्वी, पुजाराने ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर उल्लेखनीय कामगिरी केली होती. श्रीनिवासन यांनी केलेल्या वक्तव्यावर पुजाराने प्रतिक्रीया देत म्हटले होते की, “हा तर त्यांचा मोठेपणा आहे. मला अशा संघात येऊन आनंद होत आहे, जो संघ राष्ट्रीय संघासाठी केलेल्या कामगिरीची दखल घेतो.”
नेट्समध्ये केली होती प्रचंड मेहनत
चेन्नई सुपर किंग्ज संघात स्थान मिळाल्यानंतर चेतेश्वर पुजारा नेट्समध्ये प्रचंड मेहनत घेताना दिसून आला होता. त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता, ज्यामध्ये तो षटकार मारताना दिसून येत होता. ही स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच त्याने म्हटले होते की, “खेळाच्या या छोट्या प्रकारात, मैदानाच्या बाहेर शॉट खेळण्याची आवश्यकता असते. त्यामुळे मी याच गोष्टीवर मेहनत घेत आहे.” परंतु त्याला पहिल्या ११ खेळाडूंमध्ये खेळण्याची संधी मिळाली नाही. तो चेन्नईच्या आयपीएल २०२१ मधील सातही सामन्यात बाकावर बसून राहिली.
मात्र गेल्या एक महिन्यात त्याने प्रचंड मेहनत घेतली आहे. याचा त्याला आगामी विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी चांगलाच फायदा होऊ शकतो.
पुजाराची आयपीएल कारकीर्द
पुजाराने २०१४ मध्ये शेवटचा आयपीएल सामना खेळला होता. त्यानंतर त्याला एकही संघाने आपल्या संघात स्थान दिले नव्हते. आयपीएल २०२१ मध्ये झालेल्या लिलावात त्याला चेन्नई सुपर किंग्ज संघाने ५० लाखांची बोली लावत आपल्या संघात स्थान दिले होते. त्याने आतापर्यंत एकूण ३० आयपीएल सामने खेळले आहेत. यात त्याला ३१० धावा करण्यात यश आले आहे. तसेच ५१ धावा ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. त्याने २०१० मध्ये आयपीएल स्पर्धेत पदार्पण केले होते. त्यांनतर त्याने रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर, कोलकाता नाईट रायडर्स आणि पंजाब किंग्ज संघाचे प्रतिनिधित्व केले होते.
महत्त्वाच्या बातम्या-
स्टुअर्ट मॅकगिल अपहरण प्रकरणाला अनपेक्षित वळण, त्यांच्या गर्लफ्रेंडच्या भावानेच रचला होता कट!
मुंबई इंडियन्सच्या कायरन पोलार्डला मिळाली खुशखबर, ‘किंग खान’च्या संघाच्या नेतृत्त्वपदी झाली निवड