भारतात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव असतानादेखील बीसीसीआयने आयपीएल २०२१ स्पर्धा भारतात खेळवण्याचा निर्णय घेतला होता. स्पर्धेचा पहिला टप्पा यशस्वीरित्या पार पडल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात कोरोनाचा शिरकाव झाल्याचे पाहायला मिळाले होते. कोलकाता नाईट रायडर्स संघातील २ खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्यानंतर एकापाठोपाठ एक खेळाडूंना कोरोनाची लागण होऊ लागली होती. त्यामुळे आयपीएल स्पर्धा स्थगित करण्याचा निर्णय घेतला गेला आहे.
ही स्पर्धा स्थगित करण्यात आली असली तरी ही, मुंबई इंडियन्स संघाचा अष्टपैलू खेळाडू कायरन पोलार्ड लवकरच मोठ्या संघाचे नेतृत्व करताना दिसून येणार आहे.
कायरन पोलार्ड मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये वेस्ट इंडिज संघाचे नेतृत्व करतो. वेस्ट इंडिज संघाने त्याच्या नेतृत्वाखाली श्रीलंका दौऱ्यावर उल्लेखनीय कामगिरी केली होती. लवकरच कॅरेबियन प्रीमियर लीग २०२१ स्पर्धा चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. या स्पर्धेत ट्रिनबागो नाईट रायडर्स संघाचे कर्णधारपद देखील पोलार्डला देण्यात आले आहे. याबाबतची माहिती कॅरेबियन प्रीमियर लीगच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर करण्यात आली आहे.
२०१९ मध्ये देखील पोलार्डने या संघाचे नेतृत्व केले होते. त्यावेळी ड्वेन ब्रावो दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर झाला होता. परंतु या स्पर्धेत त्यांना क्वालिफायर-२ मध्ये पराभवाचा सामना करावा लागला होता.
तसेच २०२० मध्ये झालेल्या कॅरेबियन प्रीमियर लीग स्पर्धेत पोलार्डच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या या संघाने उल्लेखनीय कामगिरी केली होती. त्यांनी १० पैकी १० सामन्यात विजय मिळवला होता. इतकेच नव्हे तर जेतेपददेखील पटकावले होते. त्यामुळे या हंगामात देखील ट्रिनबागो नाईट रायडर्सला त्याच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असणार आहे. या स्पर्धेचा आगामी हंगाम येत्या २८ ऑगस्टपासून सुरू होणार आहे. तसेच या स्पर्धेतील सर्व सामने सेंट किट्सच्या वॉर्नर पार्क स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहेत.
आयपीएल २०२१ स्पर्धा स्थगित करण्यात आली असली, तरीही कायरन पोलार्डने चेन्नई सुपर किंग्ज संघाविरुद्ध खेळलेली नाबाद ८७ धावांची खेळी कोणीच विसरू शकणार नाही. हा हंगाम पोलार्डसाठी चांगला ठरताना दिसत होता.
महत्त्वाच्या बातम्या-
टेस्ट चॅम्पियनशीप अंतिम सामन्यासाठी भारतीय संघात होऊ शकते ‘सरप्राइज एंट्री’, पाहा कोण आहे तो