काही दिवसांपुर्वीच ऑस्ट्रेलियाचे माजी फिरकीपटू स्टुअर्ट मॅकगिल यांचे घरात घुसून अपहरण करण्यात आल्याची धक्कादायक घटना पुढे आली होती. यानंतर त्यांना मारहाण करण्यात आली. सोबतच बंदुकीचा धाक दाखवत धमकावण्यात आले आणि पुढील एका तासात त्यांची सुटका करण्यात आली होती. याप्रकरणी पोलिसांनी ४ व्यक्तींना अटक केली होती. आता याप्रकरणी एक आश्चर्यकारक खुलासा झाला आहे.
ऑस्ट्रेलियातील माध्यमांनुसार, मॅकगिल यांच्या अपहरण प्रकरणी अटक करण्यात आलेल्या ४ व्यक्तींमध्ये त्यांची प्रेयसी मारिया ओ मियेघेरचा भाऊ मारिनो स्टॉइरोउलोस याचाही समावेश आहे. मॅकगिल यांच्या प्रेयसीचे स्वत:चे मोठे हॉटेल आहे. मॅकगिल +मारिया यांच्या हॉटेलमध्ये जनरल मॅनेजरपदी काम पाहतात. मॅकगिल यांच्या अपहरण प्रकरणी आपल्या भावाचे नाव आल्याने मारिया यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. मागील बऱ्याच वर्षांपासून त्यांनी आपल्या भावाला पाहिले नसून त्या खूप घाबरलेल्या आहेत.
डेली टेलीग्राफशी बोलताना मॅकगिल यांची प्रेयसी मारिया यांनी सांगितले की, “मी आणि मॅकगिल सध्या एकमेकांसोबत आहोत. आम्ही दोघेही सध्या खूप घाबरलेलो आहोत. मला खूप असुरक्षित वाटत आहे. मला अजूनही कळत नाही की हे सर्व काय होत आहे. माझा भाऊ आणि मी वेगवेगळे आयुष्य जगतो आणि आम्ही मागील एका वर्षापासून एकमोकांपासून वेगळे राहतो.”
स्टुअर्ट मॅकगिल यांच्या अपहरण प्रकरणाची सविस्तर माहिती
एप्रिल १४, रोजी ५० वर्षीय मॅकगिल यांना ३ अज्ञात व्यक्तींनी घरात घुसून जबरदस्तीने कारमध्ये बसवले होते. त्यानंतर त्यांना सिडनी शहरातील बेलमोर या ठिकाणी घेऊन जाण्यात आले होते. तिथे त्यांना मारहाण करण्यात आली. शेवटी बंदुकीचा धाक दाखवत त्यांना धमकावण्यात आले आणि एका तासाने आरोपींनी त्यांची सुटका केली होती. २० एप्रिल रोजी याप्रकरणी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती.
त्यानंतर लूटमार आणि गंभीर अपराध विभागाने या प्रकरणाचा तपास सुरु केला होता. ५ मेला सकाळी याप्रकरणी पोलिसांनी ४ व्यक्तींना अटक केली होती. यामध्ये २७, २९, ४२ आणि ४६ वर्षीय व्यक्तींचा समावेश होता. यातील एक व्यक्ती मॅकगिल यांच्या प्रेयसीचा भाऊ आहे. उर्वरित तिघांसंबंधी अजून काही माहिती मिळालेली नाही.
स्टुअर्ट मॅकगिल यांची कारकिर्द
मॅकगिल यांना ऑस्ट्रेलियाच्या प्रतिभाशाली क्रिकेटपटूंमध्ये गणले जाते. १०९८ ते २००८ या कालावधीत ऑस्ट्रेलिया संघाचे प्रतिनिधित्व करताना त्यांनी अनेक विक्रमांची आपल्या नावे नोंद केली होती. ४४ कसोटी सामने खेळताना त्यांनी तब्बल २०८ विकेट्स चटकावल्या होत्या. यात १०८ धावांवर ८ विकेट्स ही त्यांची सर्वोत्तम कामगिरी राहिली होती. याबरोबरच ३ वनडे सामने खेळताना त्यांनी ६ विकेट्सची आपल्या खात्यात नोंद केली होती.
महत्त्वाच्या बातम्या-
धक्कादायक! ‘या’ माजी क्रिकेपटूचं अपहरण, बंदुकीचा धाक दाखवत करण्यात आली मारहाण
मुंबई इंडियन्सच्या कायरन पोलार्डला मिळाली खुशखबर, ‘किंग खान’च्या संघाच्या नेतृत्त्वपदी झाली निवड