राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यापूर्वी पंजाब किंग्जला मोठा धक्का बसला आहे. संघाचा स्टार वेगवान गोलंदाज कागिसो रबाडा दुखापतीमुळे मायदेशी परतलाय. रिपोर्ट्सनुसार, त्याच्या लोअर लिंबच्या सॉफ्ट टिश्यूमध्ये संसर्ग झाला होता. मात्र तो टी20 विश्वचषकादरम्यान दक्षिण आफ्रिकेसाठी उपलब्ध होऊ शकतो, असा अंदाज आहे.
रबाडानं आयपीएलच्या या हंगामात पंजाब किंंग्जकडून 11 सामन्यांत 11 विकेट घेतल्या आहेत. या दरम्यान त्याचा इकॉनॉमी रेट 8.85 एवढा राहिला. मात्र गेल्या दोन सामन्यांत तो संघाचा भाग नव्हता. पंजाब किंग्जचा संघ आधीच प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. यामुळे रबाडाला तज्ज्ञांचा सल्ला घेण्यासाठी दक्षिण आफ्रिकेत जाण्याची परवानगी देण्यात आली.
यासंदर्भात दक्षिण आफ्रिका क्रिकेटनं एक निवेदन जारी केलं आहे. रबाडावर वैद्यकीय पथक बारकाईनं लक्ष ठेवून आहे, जेणेकरून विश्वचषकातील त्याचा सहभाग निश्चित करता येईल, असं निवेदनात म्हटलंय. कागिसो रबाडा हा दक्षिण आफ्रिकेसाठी फार महत्त्वाचा खेळाडू आहे. तो संघाच्या वेगवान गोलंदाजी आक्रमणाचा लीडर आहे.
28 वर्षीय रबाडा दक्षिण आफ्रिकेसाठी तिन्ही फॉरमॅट खेळणारा खेळाडू आहे. त्यानं देशासाठी आतापर्यंत 56 टी20 सामन्यांमध्ये 58 विकेट घेतल्या आहेत. या दरम्यान त्याची सरासरी 29.88 आणि इकॉनॉमी रेट 8.61 एवढा राहिला. याशिवाय त्यानं 101 एकदिवसीय सामन्यांमध्ये दक्षिण आफ्रिकेचं प्रतिनिधित्व केलंय. ज्यामध्ये त्यानं 27.78 ची सरासरी आणि 5.06 च्या इकॉनॉमी रेटनं 157 विकेट घेतल्या आहेत. त्यानं आतापर्यंत 62 कसोटी सामने खेळले, ज्यामध्ये त्यानं 291 विकेट घेतल्या आहेत.
कागिसो रबाडाची आयपीएलमधील आकडेवारीही शानदार आहे. तो आयपीएलमध्ये पंजाब किंग्जकडून खेळण्यापूर्वी दिल्ली कॅपिटल्सचा भाग होता. आयपीएलच्या 80 सामन्यांमध्ये त्याच्या नावे 117 बळी आहेत. या दरम्यानं त्याची सरासरी 21.97 आणि इकॉनॉमी रेट 8.48 एवढा राहिला.
महत्त्वाच्या बातम्या –
आयर्लंडविरुद्ध सलग 3 षटकार मारून बाबर आझमनं केली टीकाकारांची बोलती बंद!
दिल्लीनं उडवला लखनऊचा धुव्वा! केएल राहुलची टीम प्लेऑफच्या शर्यतीतून जवळपास बाहेर