आयपीएल 2024 मध्ये पंजाब किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील सामन्याच्या सुरुवातीला मोठा वाद झाला. झालं असं की, पंजाबचा नियमित कर्णधार शिखर धवन जखमी झाला आहे. त्यामुळे सामन्यापूर्वी नाणेफेकीसाठी पंजाबकडून सॅम करन आला. मात्र त्याला पाहून राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनसोबत अनेकांना आश्चर्य वाटलं. कारण पंजाबनं ट्रॉफी अनावरणाच्या वेळी प्री-टूर्नामेंट फोटोशूटमध्ये जितेश शर्माला उपकर्णधार म्हणून पाठवलं होतं. आता अचानक राजस्थानविरुद्ध सॅम करन संघाचं नेतृत्व करताना पाहून चाहते अस्वस्थ झाले. यानंतर आता पंजाबनं या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे.
सोशल मीडियावर चाहत्यांचा राग वाढल्यानंतर पंजाब किंग्जचे प्रशिक्षक संजय बांगर यांनी स्पष्ट केलं की, जितेश शर्माला संघानं उपकर्णधार कधीच नेमलं नव्हतं. त्यांनी सांगितलं की, कर्णधारांच्या फोटोशूटमध्ये जितेश उपस्थिती होता कारण सॅम करनला युनायटेड किंगडममधून येण्यास उशिर झाला होता.
बांगर म्हणाले की, “सॅम करनला यूकेहून यायला उशीर झाला होता. त्याला काही सेशनला हजेरी लावायची होती. त्यामुळेच आम्ही त्याला पहिल्या सामन्यापूर्वी चेन्नईला पाठवू शकलो नाही. यामुळे जितेशला पाठवण्यात आलं. जितेश उपकर्णधार असेल, असं आमच्या मनात कधीच नव्हतं. धवन खेळला नाही तर सॅम करन संघाचं नेतृत्व करेल हे आमच्या मनात स्पष्ट होतं.”
सामन्याबाबत बोलायचं झालं तर, राजस्थान आणि पंजाब यांच्यातील लढत अत्यंत अटीतटीची झाली. राजस्थाननं हा सामना तीन गडी राखून जिंकला. शिमरॉन हेटमायरनं सामन्याच्या शेवटच्या षटकातील पाचव्या चेंडूवर षटकार ठोकून संघाला विजय मिळवून दिला. प्रथम फलंदाजी करताना पंजाबनं 20 षटकांत 8 गडी गमावून 147 धावा केल्या होत्या. जितेश शर्मानं 24 चेंडूत 29 धावा, लियाम लिव्हिंगस्टोननं 14 चेंडूत 21 धावा आणि आशुतोष शर्मानं 16 चेंडूत एक चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने 31 धावा केल्या. राजस्थानकडून आवेश खान आणि केशव महाराज यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.
प्रत्युत्तरात, राजस्थाननं 19.5 षटकांत सात गडी गमावून लक्ष्य गाठलं. यशस्वी जयस्वालने 28 चेंडूत 39 धावा, रियान परागनं 18 चेंडूत 23 धावा, शिमरॉन हेटमायरनं 10 चेंडूत 27 धावा आणि रोव्हमन पॉवेलनं 5 चेंडूत 11 धावा केल्या.
महत्त्वाच्या बातम्या –
पंजाब किंग्ज अडचणीत, कर्णधार शिखर धवन दुखापतग्रस्त; जाणून घ्या किती सामने खेळणार नाही
मोठी बातमी! रिषभ पंतवर बंदी घातली जाणार? दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार मोठ्या अडचणीत… Rishabh Pant
काय सांगता, रोहित शर्मा बनला चक्क बस ड्रायव्हर! सोशल मीडियावर व्हिडिओ होतोय व्हायरल