पुणे, दि. 13 ऑक्टोबर 2023 – पीवायसी हिंदू जिमखाना यांच्या वतीने आयोजित पाचव्या पीवायसी गोल्डफिल्ड राजू भालेकर स्मृती करंडक 19 वर्षाखालील गटाच्या क्रिकेट स्पर्धेत 12 संघांना आमंत्रित करण्यात आले असून स्पर्धेला 14 ऑक्टोबर पासून प्रारंभ होत आहे.
पत्रकारपरिषदेत अधिक माहिती देताना पीवायसी हिंदू जिमखानाचे अध्यक्ष कुमार ताम्हाणे, पीवायसी हिंदू जिमखानाचे सचिव सारंग लागू व क्रिकेट विभागाचे सचिव विनायक द्रविड यांनी सांगितले की या स्पर्धेत पीवायसी हिंदू जिमखाना, व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमी, पूना क्लब, क्लब ऑफ महाराष्ट्र, डेक्कन जिमखाना, केडन्स, पारसी जिमखाना, एम सी ए अ, एम सी ए ब, विलास क्रिकेट क्लब, स्टार्स क्रिकेट क्लब, अंबिशियस किंवा युनायटेड स्पोर्ट्स क्लब हे 12 संघ झुंजणार आहेत. या स्पर्धेतील सामने पीवायसी हिंदू जिमखाना, डेक्कन जिमखाना, व्हेरॉक, ब्रिलियंटस अकादमी व पुना क्लब येथील मैदानावर होणार आहे. स्पर्धेला सलग पाचव्या वर्षी रॉयल गोल्डफिल्ड क्लब रिसॉर्टस लिमिटेड यांचे प्रायोजकत्व लाभले असून आम्ही त्यांचे आभारी आहोत.
रॉयल गोल्डफिल्ड क्लब रिसॉर्टस लिमिटेड, दापोलीचे अनिल छाजेड आणि टीएन सुंदर यांनी सांगितले की, सर्व स्तरातील खेळाडूंना जागतिक दर्जाच्या क्रीडा सुविधा आणि पायाभूत साधनसामुग्री उपलब्ध करून देणे हे रॉयल गोल्डफिल्ड क्लब रिसॉर्टसचे मुख्य लक्ष्य आहे. तसेच क्रीडा प्रशिक्षण व सराव शिबिरे, प्रशिक्षण अकादमी आणि व्यावसायिक प्रशिक्षण या सर्वांच्या माध्यमांतून गुणवान उदयोन्मुख खेळाडूंना प्रोत्साहन व संधी उपलब्ध करून देणे हेसुद्धा आमचे प्रमुख लक्ष्य आहे. रॉयल गोल्डफिल्ड क्लब रिसॉर्टसने याआधीच इंग्लंडमधील काऊंटी क्लबच्या धर्तीवर सुविधा असणारे क्रिकेटचे मैदान व पॅव्हेलियन यांची उभारणी केली असून आगामी भविष्य काळात याठिकाणी जागतिक दर्जाच्या अत्याधुनिक सुविधा टप्प्याटप्प्याने विकसित केल्या जातील. त्यामुळे हे मैदान पूर्णतः सुसज्ज होईल.
विनायक द्रविड पुढे म्हणाले की, ही स्पर्धा साखळी व बाद पध्दतीने होणार असून स्पर्धेतील सामने प्रत्येकी 90 षटकांचे खेळविण्यात येणार आहेत. 12 संघांची तीन गटांमध्ये प्रत्येकी 4 संघ अशी विभागणी करण्यात आली आहे. साखळी सामन्यांमध्ये प्रत्येक संघ त्या गटामधल्या प्रत्येक संघाशी एकदा खेळेल. प्रत्येक गटांतील अव्वल एक संघ आणि एक संघ उर्वरित 9 संघांमधून गुण सरासरीवर उपांत्य फेरीसाठी पात्र ठरणार आहे.
ते पुढे म्हणाले की, स्पर्धेतील विजेत्या संघाला राजू भालेकर स्मृती करंडक देण्यात येणार आहे. याशिवाय स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट फलंदाज, सर्वोत्कृष्ट गोलंदाज, सर्वोत्कृष्ट यष्टीरक्षक, सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक आणि मालिकावीर यांना करंडक देण्यात येणार आहे. स्पर्धेचा उद्घाटनाचा व अंतिम सामना पीवायसी हिंदू जिमखान्याच्या क्रिकेट मैदानावर होणार आहे. स्पर्धेच्या यशस्वी संयोजनासाठी संयोजन समिती स्थापन करण्यात आली असून यामध्ये विनायक द्रविड, सारंग लागू, निरंजन गोडबोले, पराग शहाणे, इंद्रजीत कामतेकर, यांचा सहभाग आहे. (PYC Goldfield Raju Bhalekar Smriti Karandak Under 19 Group Cricket Tournament Consists of 12 Teams)