पुणे । पीवायसी हिंदू जिमखाना क्लब आयोजित तेराव्या पीवायसी-एटीसी स्नुकर अजिंक्यपद 2019 स्पर्धेत गटसाखळी फेरीत पीवायसी वॉरियर्स, खार जिमखाना, क्यू क्लब वॉरियर्स, क्यू मास्टर्स अ, कॉर्नर पॉकेट शूटर्स, खार जिमखाना या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून आजचा उदघाटनाचा दिवस गाजवला.
पीवायसी हिंदू जिमखाना व डेक्कन जिमखाना येथील बिलियर्ड्स हॉलमध्ये आजपासून सुरु झालेल्या या स्पर्धेत गटसाखळी फेरीत ह गटात कॉर्नर पॉकेट शूटर्स संघाने रॅक एम अप संघाचा 2-1 असा संघर्षपूर्ण पराभव करून विजयी सलामी दिली. सामन्यात कॉर्नर पॉकेट शूटर्सच्या तहा खानने रॅक एम अप संघाच्या प्रत्युश सोमय्याजुलाचा 47-23, 77-38, 40-37 असा पराभव करून संघाला आघाडी मिळवून दिली.
त्यानंतर दुसऱ्या सामन्यात कॉर्नर पॉकेट शूटर्सच्या साद सय्यद याने उत्कृष्ट खेळ करत रॅक एम अप संघाच्या विशाल वायाचा 19-42, 74(67)-37, 39-21, 69-16 असा पराभव करून संघाला विजयी आघाडी मिळवून दिली. साद याने आपल्या खेळीत दुसऱ्या फ्रेममध्ये 67 गुणांचा ब्रेक नोंदवत आजचा दिवस गाजवला. तिसऱ्या सामन्यात कॉर्नर पॉकेट शूटर्सच्या संकेत मुथाला रॅक एम अप संघाच्या सुमित साळदुरकरने 36-07, 48-67, 00-39, 48-61 असे पराभूत करून ही आघाडी कमी केली.
अ गटात आदित्य देशपांडे, योगेश लोहिया, राजवर्धन जोशी यांनी केलेल्या अफलातून कामगिरीच्या जोरावर पीवायसी वॉरियर्स संघाने क्यू क्लब किलर्सचा 3-0 असा एकतर्फी पराभव करून शानदार सुरुवात केली. खार जिमखाना संघाने क्यू मास्टर्स ब संघावर 2-1अशा फरकाने विजय मिळवला. अन्य लढतीत ड गटात विरेन शर्मा, शाहबाज खान, अल्तमेश सैफी यांनी केलेल्या विजयी कामगिरीच्या जोरावर क्यू क्लब वॉरियर्स संघाने ठाणे टर्मिनेटर्स संघाचा 3-0 असा पराभव करून विजयी सलामी दिली. फ गटाच्या लढतीत क्यू मास्टर्स अ संघाने पीवायएफ संघाला 3-0 असे नमविले. इ गटात ऑटो पॉट्स संघाने ठाणे टायगर्सला 3-0 असे पराभूत केले.
स्पर्धेचे उदघाटन एटीसीचे संचालक मिहीर भडकमकर, सिनर्जी हॉलिडेजचे संचालक मंदार देवगावकर, बिलियर्ड्स अँड स्नूकर फेडरेशन ऑफ इंडियाचे उपाध्यक्ष व मनिषा कन्स्ट्रक्शनचे व्यवस्थापकीय संचालक राजन खिंवसरा आणि पीवायसी हिंदू जिमखानाचे अध्यक्ष डॉ.सुधीर भाटे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी क्लबचे मानद सचिव आनंद परांजपे, क्लबच्या बिलियर्ड्स विभागाचे सचिव तन्मय आगाशे, स्पर्धेचे संचालक सलील देशपांडे, अरुण बर्वे, कपिल खरे आदी मान्यवर उपस्थित होते.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: गटसाखळी फेरी:
गट अ: पीवायसी वॉरियर्स वि.वि.क्यू क्लब किलर्स 3-0(आदित्य देशपांडे वि.वि.अमरदीप घोडके 14-32, 71-14, 27-26, 52-42; योगेश लोहिया वि.वि.प्रसाद परादे 30-10, 64-37, 40-09; राजवर्धन जोशी वि.वि.विशाल रजनी 46-26, 64-57, 43-23);
गट अ: खार जिमखाना वि.वि.क्यू मास्टर्स ब 2-1(स्पर्श फेरवानी वि.वि.आर्यन राजहंस 53-25, 65-16, 42-09; रिषभ ठक्कर वि.वि.अभिषेक श्रीवास्तवा 42-13, 57-01, 22-29, 69-17; ईशप्रित चड्डा पुढे चाल वि.तुषार सराधी);
गट इ: ऑटो पॉट्स वि.वि.ठाणे टायगर्स 3-0(रिषभ जैन वि.वि.कुणाल रोकडे 47-36, 71-62, 24-40, 89-03; लव्ह बोरीचा वि.वि.जयेश चौधरी 23-44, 56-11, 37-02, 51-34; पारस जैन वि.वि.जीत ठाकूर 51-00, 69-15, 49-36);
गट ड: क्यू क्लब वॉरियर्स वि.वि.ठाणे टर्मिनेटर्स 3-0(विरेन शर्मा वि.वि.अभिषेक सोपरकर 39-32, 75-19, 20-30, 55-38; शाहबाज खान वि.वि.निखिल पटेल 42-09, 83-55, 54-13; अल्तमेश सैफी वि.वि.अरुणकुमार व्ही.एन. 06-52, 68-32, 50-00, 73-18);
गट फ: क्यू मास्टर्स अ वि.वि.पीवायएफ 3-0(समीर बिडवई वि.वि.अंकुश प्रसाद 37-19, 69-21, 18-31, 49-19; सिद्धार्थ टेंबे वि.वि.अमित अगरवाल 21-32, 13-60(51), 44-18, 83-01, 53-18; सतीश कराड वि.वि.बिपीन संकपाळ 44-22, 62-29, 34-30);
गट ह: कॉर्नर पॉकेट शूटर्स वि.वि.रॅक एम अप 2-1(तहा खान वि.वि.प्रत्युश सोमय्याजुला 47-23, 77-38, 40-37; साद सय्यद वि.वि.विशाल वाया 19-42, 74(67)-37, 39-21, 69-16; संकेत मुथा पराभूत वि.सुमित साळदुरकर 36-07, 48-67, 00-39, 48-61).