चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर चालू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्याचा तिसरा दिवसही भारतीय खेळाडूंनीच गाजवला. पहिल्या डावात प्रथम फलंदाजी करताना सलामीवीर रोहित शर्माने झुंजार दीडशतकी खेळी केली होती. तर दुसऱ्या डावात अष्टपैलू आर अश्विनने इंग्लंडच्या गोलंदाजांचा समाचार घेत शतक झळकावले. फलंदाजीत लक्षणीय कामगिरी करण्यापुर्वी त्याने इंग्लंडच्या पहिल्या डावात बळींचा पंचक केला होता. यासह एका खास विक्रमात अश्विनने मोठमोठ्या दिग्गजांना मागे टाकले आहे.
आठव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या अश्विनने डावाखेर एकाकी झुंज दिली. १४८ चेंडूंचा सामना करताना त्याने १०६ धावांची अफलातून खेळी केली. या खेळी दरम्यान त्याने १ षटकार आणि १४ चौकार मारले. अखेर इंग्लंडचा गोलंदाज ऑली स्टोनने त्याला त्रिफळाचित करत भारताचा दुसरा डाव गुंडाळला.
तत्पुर्वी इंग्लंडच्या पहिल्या डावात हातखंडा असलेल्या गोलंदाजीतही अश्विनने चमकदार कामगिरी केली होती. २३.५ षटके टाकत त्याने ४३ धावांवर ५ बळी मिळवले होते.
अशाप्रकारे एकाच सामन्यात शतक आणि बळींचा पंच घेण्याचा खास विक्रम अश्विनने केला. विशेष म्हणजे, ही खास कामगिरी करण्याची अश्विनची पहिली वेळ नव्हती. यापुर्वीही त्याने तब्बल २ वेळा हा कारनामा केला होता. यासह सर्वाधिक वेळा एका कसोटी सामन्यात शतकासह ५ बळी घेणाऱ्या विक्रमवीरांच्या यादीत अश्विनने दुसरे स्थान पटकावले आहे.
याबाबतीत त्याने गॅरी सोबर्स, मुश्ताक मोहम्मद, जॅक्स कॅलीस आणि शाकिब अल हसन यांना पिछाडीवर सोडले आहे. तर आयन बॉथम सर्वाधिक ५ वेळा हा पराक्रम करत अव्वलस्थानी कायम आहेत.
एकाच कसोटी सामन्यात शतक आणि ५ बळी घेणारे टॉप-३ खेळाडू
५ वेळा- आयन बॉथम
३ वेळा- आर अश्विन
२ वेळा- गॅरी सोबर्स, मुश्ताक मोहम्मद, जॅक्स कॅलीस आणि शाकिब अल हसन
महत्त्वाच्या बातम्या-
हे काय केलंस? इंग्लंडच्या खेळाडूंना भेटण्यासाठी भिडूने चढली तब्बल १२ मीटरची जाळी
चेन्नई कसोटीत विराटचे झुंजार अर्धशतक, गांगुलीला पछाडत ‘या’ स्थानी झेप
चेन्नईचा सरंपच! अश्विनची ‘ही’ कामगिरी पाहून समलोचकांनी दिली भन्नाट उपमा, तुम्हीही असंच म्हणाल