दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात मंगळवारी (२८ सप्टेंबर) आयपीएल २०२१ चा ४१ वा सामना झाला. शारजाहच्या मैदानावर झालेल्या या सामन्यात कोलकाता संघाने दिल्लीवर ३ विकेट्सने सोपा विजय मिळवला. या सामन्यादरम्यान प्रतिस्पर्धी संघातील आर अश्विन आणि टीम साऊथी यांच्यामध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. यामध्ये कोलकाताचा कर्णधार इयॉन मॉर्गन यानेही उडी घेत अश्विनच्या खेळ भावनेवर प्रश्न उपस्थित केले. यावर आता अश्विनने त्याला सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे.
त्याचे झाले होते असे की, दिल्लीची फलंदाजी सुरू असताना १९ व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर कोलकाताच्या राहुल त्रिपाठीने मारलेला थ्रो दिल्लीचा कर्णधार रिषभ पंतला लागून दूर निघून गेला होता. यावर नॉन स्ट्राईकवर उभा असलेल्या अश्विनने धाव घेण्याचा प्रयत्न केला होता. कोलकाताच्या खेळाडूंना त्याचे हे वागणे खटकले होते. त्यांना हे खेळ भावनेच्या विरुद्ध वाटले. त्यानंतर अश्विनची विकेट गेल्यानंतर त्याच्यात आणि कोलकाताच्या टीम साऊथीमध्ये शाब्दिक वाद झाला होता. यामध्ये मॉर्गननेही उडी घेत अश्विनला ऐकवण्याचा प्रयत्न केला होता.
हा सामना झाल्यानंतर मॉर्गनने म्हटले होते की, ‘मी जे पाहतो आहे त्यावर मी विश्वास ठेवू शकत नाही. आयपीएल हे लहान मुलांसाठी एक भयानक उदाहरण आहे. मला वाटते की, वेळ आल्यावर अश्विनला त्याचा पश्चाताप होईल.’
https://twitter.com/ashwinravi99/status/1443461524778012673?s=20
मॉर्गनच्या या वक्तव्याला प्रत्युत्तर देत अश्विनने लिहिले की, ‘मी पाहिले होते की, क्षेत्ररक्षकाने चेंडू टाकला होता आणि मला माहिती नव्हते की तो चेंडू रिषभला लागला होता. जर मी त्याला चेंडू लागताना पाहिले असते तर मी धाव घेण्यासाठी पळालो असतो का? हो, मी पळालो असतो आणि मला याची परवानगीसुद्धा आहे. मॉर्गनने याविषयी काय म्हटल्याने मी वाईट बनेल का? नाही, असे नाही होणार.’
https://twitter.com/ashwinravi99/status/1443461528464896009?s=20
‘मी कोणती लढाई केली आहे का? नाही मी फक्त माझ्यासाठी उभा राहिलो. मी तेच केले जे मला आई-वडिल आणि शिक्षकांनी शिकवले होते. तुम्हीही तुमच्या मुलांना स्वत:साठी उभे राहायला शिकवा. मॉर्गन आणि साऊथी क्रिकेटविश्वात त्यांना जे वाटेल, त्याला योग्य आणि अयोग्य समजू शकतात. परंतु तत्वांची भाषा करताना चुकीच्या शब्दांचा वापर करण्याचा अधिकार त्यांना नाही. त्याहूनही जास्त आश्चर्याची बाब म्हणजे, लोक यावर चर्चा करत आहेत आणि सांगण्याचा प्रयत्न करत आहेत की, काय बरोबर आहे आणि काय चूक.’
https://twitter.com/ashwinravi99/status/1443461534093561856?s=20
‘बरेचसे खेळाडू याच्याशी जोडले गेले आहेत, जे हा महान खेळ खेळतात आणि त्यामध्येच त्यांची कारकिर्द घडवतात. त्यांना हे शिकवले गेले आहे की, खराब थ्रो जो तुम्हाला बाद करण्यासाठी फेकला गेला आहे. त्यावर तुम्ही धावा घेत तुमची कारकिर्द घडवू शकता. त्यामुळे त्यांना हे सांगून गोंधळात टाकू नका की, तुम्ही अशा चेंडूवर धाव घेण्यासाठी नकार देऊन किंवा नॉन स्ट्राईकर फलंदाजाला चेतावणी देऊन चांगले व्यक्ती बनाल. कारण जे लोक तुम्हाला चांगले किंवा वाईट सांगत आहे, त्यांचे घरही याच खेळावर चालते. मैदानावर खेळताना आपले सर्वस्व झोकून देऊन खेळणे, नियमांचे पालन करणे आणि सामना संपल्यानंतर एकमेकांशी हात मिळवणे, माझ्यासाठी हीच खेळ भावना आहे,’ असेही त्याने लिहिले आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
ज्याच्या हातून दुर्दैवीपणे बाद झाला, त्यालाच कोहलीची ‘ग्रेटभेट’; क्रिकेटपटूंचा क्षण चाहत्यांना भावला
VIDEO: ‘बूम बूम’ची युएईतून थेट युरोपात उडी…! खास गोलंदाजी ऍक्शनने वेधतोय सोशल मीडियाचं लक्ष
‘टी२० विश्वचषकासाठी आम्ही आमचे सर्वस्व झोकून देऊ, यंदा चषक आपलाच’, रोहितचा चाहत्यांना शब्द