विशाखापट्टणम। बुधवारपासून(2 ऑक्टोबर) भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात सुरु झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात आज(4 ऑक्टोबर) तिसऱ्या दिवसाखेर दक्षिण आफ्रिकेने पहिल्या डावात 8 बाद 385 धावा केल्या आहेत. या डावात भारताकडून फिरकीपटू आर अश्विनने 5 विकेट घेत शानदार कामगिरी केली.
त्याने या डावात एडेन मार्करम, थेऊनिस डी ब्रायन, फाफ डू प्लेसिस, क्विंटॉन डी कॉक आणि वर्नोन फिलँडर या दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांना बाद केले आहे. अश्विनची ही भारतात एका कसोटी डावात 5 किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेण्याची 21 वी वेळ आहे.
त्यामुळे त्याने कसोटी क्रिकेटमध्ये मायदेशात सर्वाधिकवेळा एका डावात 5 किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेण्याच्या यादीत जेम्स अँडरसनची बरोबरी केली आहे. अँडरसननेही इंग्लंडमध्ये 21 वेळा एका कसोटी डावात 5 किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेण्याची कामगिरी केली आहे.
या यादीत अव्वल क्रमांकावर मुथय्या मुरलीधरन आहे. मुथय्या मुरलीधरनने श्रीलंकेमध्ये 45 वेळा एका कसोटी डावात 5 किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेण्याचा विश्वविक्रम केला आहे.
सध्या भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात सुरु असलेल्या पहिल्या कसोटीत दक्षिण आफ्रिकेडून पहिल्या डावात डिन एल्गारने 160 धावांची तर क्विंटॉन डि कॉकने 111 धावांची शतकी खेळी केली आहे. तर कर्णधार फाफ डू प्लेसिसने 55 धावांची अर्धशतकी खेळी केली. तिसऱ्या दिवसाखेर सेनुरन मुथूसामी(12) आणि केशव महाराज(3) नाबाद खेळत आहे.
भारताकडून तिसऱ्या दिवसाखेर अश्विन बरोबरच रविंद्र जडेजाने 2 विकेट्स आणि इशांत शर्माने 1 विकेट घेतली आहे.
मायदेशात एका कसोटी डावात सर्वाधिकवेळा 5+ विकेट्स घेणारे गोलंदाज –
45 – मुथय्या मुरलीधरन (श्रीलंका)
26 – रंगना हेराथ (श्रीलंका)
25 – अनिल कुंबळे (भारत)
21 – जेम्स अँडरसन (इंग्लंड)
21 – आर अश्विन (भारत)
18 – हरभजन सिंग (भारत)