आगामी बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये भारताच्या गोलंदाजांकडून चाहत्यांना खूप अपेक्षा आहेत. टीम इंडियानं ही मालिका जिंकून ऑस्ट्रेलियात कसोटी विजयाची हॅट्ट्रिक साधावी, अशी भारतीय चाहत्यांची इच्छा आहे. भारतीय संघ ही मालिका मोठ्या फरकानं जिंकण्याचा प्रयत्न करेल. भारताला जागतिक कसोटी चॅम्पियनशिप अर्थात WTC च्या अंतिम फेरीत थेट प्रवेश करायचा असेल, तर मालिकेत किमान 4-0 असा विजय मिळवावा लागेल.
या मालिकेत भारताचा अनुभवी फिरकीपटू आर अश्विन याच्याकडे इतिहास रचण्याची संधी आहे. तो भारताचा महान गोलंदाज कपिल देव याचा मोठा विक्रम मोडू शकतो. वास्तविक, आर अश्विन या मालिकेत भारताकडून ऑस्ट्रेलियात सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज बनू शकतो. यासाठी त्याला मालिकेत केवळ 13 विकेट घ्यावा लागतील. सध्या ऑस्ट्रेलियात सर्वाधिक विकेट घेणाऱ्या भारतीय गोलंदाजांच्या यादीत कपिल देव 51 बळींसह अव्वल स्थानी आहे. तो ऑस्ट्रेलियन भूमीवर 50 पेक्षा अधिक विकेट घेणारा एकमेव भारतीय आहे.
या यादीत अनिल कुंबळे (49) दुसऱ्या स्थानावर, आर अश्विन (39) तिसऱ्या स्थानावर, बिशन सिंग बेदी (35) चौथ्या स्थानावर आणि जसप्रीत बुमराह (32) पाचव्या स्थानावर आहे. म्हणजेच, अश्विननं 13 विकेट घेताच तो कपिल देवचा विक्रम मोडेल. मात्र ऑस्ट्रेलियन खेळपट्ट्यांवर वेगवान गोलंदाजांना मिळणारी मदत पाहता अश्विनला या मालिकेत खेळण्याची संधी कमी मिळू शकते. अशा परिस्थितीत जसप्रीत बुमराहकडे देखील हा रेकॉर्ड मोडण्याची संधी आहे.
कपिल देवचा विक्रम मोडण्यासाठी बुमराहला अजून 20 विकेट्सची गरज आहे. बुमराहच्या कारकिर्दीवर नजर टाकली तर त्यानं 5 पैकी 4 सामने खेळले तरी तो कपिल देवला सहज मागे सोडेल. बुमराहनं ऑस्ट्रेलियातील शेवटच्या कसोटी मालिकेत 20 हून अधिक बळी घेतले होते. आता या मालिकेत या दोघांपैकी कोणता गोलंदाज हा विक्रम मोडतो, हे पाहणं उत्सुकतेचं ठरेल.
हेही वाचा –
“बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी जिंकायची असेल, तर विराटला…”, मायकेल क्लार्कची कोहलीबाबत मोठी प्रतिक्रिया
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सर्वाधिक शतक ठोकणारे भारतीय फलंदाज
IND vs AUS: ‘जर मी त्याच्या जागी असतो…’, रोहित शर्माच्या ब्रेकवर सौरव गांगुलीची स्पष्ट प्रतिक्रिया