नुकत्याच मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर पार पडलेल्या बॉक्सिंग डे कसोटी सामन्यात भारतीय संघाने क्रिकेट रसिकांचे पैसावसूल मनोरंजन केले. २६ डिसेंबर ते ३० डिसेंबर दरम्यान झालेल्या या लढतीत भारताने ८ विकेट्सने ऑस्ट्रेलियावर मात केली. यासह भारत आणि ऑस्ट्रेलिया संघ मालिकेत १-१ ने बरोबरीवर आहेत. या सामन्यानंतर आयसीसीने ताजी कसोटी क्रमवारी जाहीर केली आहे. या क्रमवारीत भारतीय गोलंदाजांना मोठा फायदा झाला आहे.
अश्विन-बुमराहची भरारी
भारताचा अनुभवी फिरकीपटू आर अश्विन याला २ स्थानांचा फायदा झाला आहे. तो ७९३ गुणांची कमाई करत सातव्या स्थानी विराजमान झाला आहे. तर वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याने दहाव्या स्थानावरुन नवव्या स्थानी उडी घेतली आहे. त्याच्या खात्यात ७८३ गुणांची नोंद झाली आहे. अशाप्रकारे दोन भारतीय गोलंदाजांनी टॉप-१० मध्ये स्थान मिळवले आहे.
मिचेल स्टार्कचा टॉप-५ मध्ये प्रवेश
याशिवाय ऑस्ट्रेलियाचा डावखुरा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क यालाही मोठा फायदा झाला आहे. या ३० वर्षीय गोलंदाजाने २ स्थानांची प्रगती करत पहिल्या पाच गोलंदाजांमध्ये जागा मिळवली आहे. विशेष म्हणजे, ऑस्ट्रेलियन गोलंदाज पॅट कमिन्स या क्रमवारीत अव्वलस्थानी कायम आहे. याउलट वेगवान गोलंदाज जोश हेजलवुडची तीन स्थानांनी घसरण झाली आहे. त्यामुळे तो पाचव्या स्थानावरुन आठव्या स्थानी आला आहे.
🇦🇺 Mitchell Starc enters top five
🇮🇳 R Ashwin jumps to No.7
🇮🇳 Jasprit Bumrah becomes No.9Latest update in the @MRFWorldwide ICC Test Rankings 👉 https://t.co/OMjjVwOboH pic.twitter.com/RLU1nMpfoV
— ICC (@ICC) December 31, 2020
बॉक्सिंग डे कसोटीत चमकले भारतीय गोलंदाज
अजिंक्य रहाणेच्या शतकी खेळीसह भारतीय गोलंदाजांचाही बॉक्सिंग डे कसोटीतील विजयात मोठा वाटा राहिला. या सामन्यातील पहिल्या डावात बुमराह, अश्विन आणि पदार्पणवीर मोहम्मद सिराजने मिळून ऑस्ट्रेलियाला अवघ्या १९५ धावांवर गारद केले होते. दरम्यान बुमराहने सर्वाधिक ४ विकेट्स तर अश्विनने ३ विकेट्स घेतल्या होत्या. तसेच दुसऱ्या डावातही ऑस्ट्रेलिया संघाला केवळ २०० धावांवर सर्वबाद करण्यात बुमराह-अश्विनने महत्त्वपुर्ण भूमिका बजावली होती.
महत्त्वाच्या बातम्या-
भारताला मोठा झटका! प्रमुख वेगवान गोलंदाज उमेश यादव कसोटी मालिकेतून बाहेर
दहावी विकेट काढण्यासाठी विलियम्सनने ‘अशी’ लढवली शक्कल, व्हिडिओ पाहून तुम्हीही कराल प्रशंसा
जागतिक कसोटी क्रमवारीत न्यूझीलंडची अव्वल स्थानी झेप, ‘या’ संघाला टाकले मागे