fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

२०२० आयपीएलमध्ये आर अश्विन खेळणार ‘या’ संघाकडून!

भारताचा फिरकीपटू आर अश्विन 2018 आणि 2019 च्या आयपीएल मोसमात किंग्स इलेव्हन पंजाबकडून खेळला आहे. पण आता तो 2020 च्या आयपीएल मोसमासाठी दिल्ली कॅपिटल्स  संघाकडून खेळण्याची शक्यता आहे.

यापूर्वी किंग्स इलेव्हन पंजाबचे सह संघमालक नेस वाडियांनी अश्विनला दिल्लीबरोबर ट्रेड करण्यास नकार दिला होता. पण नुकत्याच आलेल्या वृत्तानुसार दिल्लीने या फिरकीपटूला आपल्या संघात स्थान दिले आहे.

किंग्ज इलेव्हन पंजाबचे क्रिकेट संचालक अनिल कुंबळे यांनी अश्विनच्या भविष्याबद्दल अनिश्चितता व्यक्त करत सांगितले की त्याने नुकतीच संचालक आणि प्रशिक्षक म्हणून जाबाबदारी स्विकारली आहे. त्यामुळे त्यांनी याबद्दल जास्त भाष्य केले नव्हते.

या प्रकरणाबाबत एका सुत्राने नाव न सांगण्याच्या अटीवरुन पीटीआयला सांगितले, ‘हो, अश्विन दिल्ली कॅपिटल्स संघाशी जोडला जाणार आहे. याआधी पंजाबला अश्विनचे ट्रेडिंग करताना दिल्लीकडून हवे असणारे दोन खेळाडू मिळत नव्हते. पण आता त्यांना ते दोन खेळाडू मिळणार आहेत आणि 99 टक्के हे निश्चित झाले आहे.’

पण अजून किंग्स इलेव्हन पंजाब किंवा दिल्ली कॅपिटल्स संघाकडून याबद्दल कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

अश्विनला पंजाबने 2018 मध्ये आयपीएल लिलावात 7.8 कोटी रुपयांची बोली लावत संघात सामील करुन घेतले होते. तसेच याच मोसमात त्यांनी त्याला कर्णधारपदाची जबाबदारीही दिली होती. पण अश्विनच्या नेतृत्वाखाली पंजाबला 2018 आणि 2019 या मोसमात मोठे यश मिळवण्यात अपयश आले.

अश्विनने पंजाबसाठी 2018 आणि 2019 या दोन मोसमात मिळून 28 सामने खेळले. यामध्ये त्याने 25 विकेट्स घेतल्या. तसेच त्याच्या नेतृत्वाखाली पंजाब संघ 2018 आणि 2019 मोसमात गुणतालिकेत अनुक्रमे सातव्या आणि सहाव्या क्रमांकावर राहिला.

You might also like