सोमवारी (५ ऑक्टोबर) दुबई येथे रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स संघात आयपीएल २०२०चा १९ वा सामना झाला. या सामन्यादरम्यान दिल्लीचा अनुभवी फिरकीपटू आर अश्विनला संधी असूनही त्याने बेंगलोरचा फलंदाज ऍरॉन फिंचला मंकडींगने बाद केले नव्हते. याबद्दल अश्विनने आपल्या यूट्यूब चॅनेलवर फिंचला बाद न करण्याचे कारण सांगितले आहे.
या कारणाचा खुलासा करत त्याने म्हटले की, “सोमवारी आयपीएल सामन्यादरम्यान फिंच नॉन स्ट्रायकर एन्डवर क्रीझच्या बाहेर गेल्यानंतरही मैत्रीमुळे त्याला बाद केले नाही. त्याला शेवटची चेतावणी म्हणून सोडून दिले. आम्ही एकमेकांना खूप चांगल्या प्रकारे ओळखतो. २०१८ मध्ये आम्ही दोघेही किंग्स इलेव्हन पंजाब संघात सहकारी राहिलो आहोत. आम्ही एकसोबत अनेक वेळा वेळ घालवला आहे.”
“मी गोलंदाजी करणारच होतो, तेवढ्यात मी पाहिले की फिंच क्रीझच्या खूप बाहेर आहे. मी थांबलो. मी त्याला बाद करण्याचा विचार करत होतो, तेवढ्यात फिंच थांबला. तो मला पाहू लागला. परंतु क्रीझवर आला नाही. तो तिथेच थांबला. मला नाही माहिती की तो तिथेच का थांबला होता,” असे पुढे बोलताना अश्विन म्हणाला.
आयपीएलपूर्वी रिकी पाँटिंगने मंकडींगने बाद न करण्याबद्दल अश्विनसोबत केली होती चर्चा
अश्विनने २०१९ मध्ये सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात फलंदाज जॉस बटलरला नॉन स्ट्रायकर एन्डवर क्रीझच्या बाहेर गेल्यामुळे धावबाद केले होते. अश्विन त्यावेळी किंग्स इलेव्हन पंजाब संघाचा कर्णधार होता. अश्विनवर अनेक क्रिकेटपटूंनी टीका केली होती. त्यानंतर आयपीएल २०२० ला सुरुवात होण्यापूर्वीच दिल्ली कॅपिटल्स संघाचा मुख्य प्रशिक्षक रिकी पाँटिंगने म्हटले होते की, “मंकडींगने बाद न करण्याबद्दल मी अश्विनशी चर्चा करेल.”
पाँटिंगने संघांच्या धावा कमी करण्यासाठी आयसीसीसोबत केली आहे चर्चा
आर अश्विनने सांगितले की, बेंगलोरच्या सामन्यानंतर प्रशिक्षक पाँटिंगसोबत त्याची चॅटवर चर्चा झाली होती. पाँटिंगने म्हटले होते की, “मला फिंचला बाद करायला पाहिजे होते. तो (फिंच) खूप दूर गेला होता.” पुढे तो म्हणाला की, “पाँटिंग आयसीसीसोबत दंड म्हणून संघांच्या धावा कमी करण्याबाबत चर्चा करत आहे, ज्या संघांचे खेळाडू नॉन स्ट्रायकर एन्डवर क्रीझमधून खूप दूर जातात.”
१० धावा कमी केल्या पाहिजेत- अश्विन
दंडाबद्दल बोलताना अश्विन पुढे म्हणाला, “संघांविरुद्ध कठोर शिक्षा झाली पाहिजे असे मला वाटते. ज्या संघाचे खेळाडू नॉन स्ट्रायकर एन्डवर चेंडू टाकण्यापूर्वी बाहेर जातात, त्या संघाच्या १० धावा कमी केल्या पाहिजेत.”
मंकडींंगने बाद करणे कौशल्य नाही, गोलंदाजांची मजबूरी आहे
“नॉन स्ट्रायकर एन्डवर क्रीझ सोडून पुढे जाणाऱ्या फलंदाजांना मंकडींगने बाद करणे हे काही कौशल्य नाही. परंतु गोलंदाजांकडे दुसरा पर्याय नसतो. जेव्हापर्यंत फलंदाज नॉन स्ट्रायकर एन्डवर क्रीझ सोडून पुढे जाऊन धाव घेईल आणि त्यासाठी त्याला पश्चाताप होणार नसेल, तोपर्यंत हे असेच होत राहील. मी नेहमी पोलिसांप्रमाणे पहारा देत राहणार नाही,” असे मंकडींगबद्दल बोलताना अश्विन म्हणाला.
काय आहे मंकडींग प्रकरण
कोणताही गोलंदाज जर चेंडू फेकण्यासाठी धावत असेल, आणि त्याचवेळी नॉन स्ट्रायकर एन्डवर उपस्थित असलेला फलंदाज जर क्रीझमधून बाहेर गेला, तर गोलंदाज तिथे त्याला बाद करू शकतो. अशाप्रकार बाद करण्याच्या पद्धतीला मंकडींग म्हटले जाते.
१३ डिसेंबर, १९४७ साली भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात एक कसोटी सामना झाला होता. त्या सामन्यादरम्यान भारतीय संघाचे गोलंदाज वीनू मांकड यांनी ऑस्ट्रेलियाच्या बिल ब्राऊनला अशाच पद्धतीने बाद केले होते. त्यानंतर वीनू यांच्या आडनावावरून याला ‘मंकडींग’ असे म्हटले जाऊ लागले.
महत्त्वाच्या बातम्या-
-केदार जाधवची सीबीआय चौकशी करा, चाहत्यांनी केली अजब मागणी
-दुःखद ! आर अश्विनच्या संघसहकाऱ्याने घेतला जगाचा निरोप
-‘सिंह म्हातारा झालाय, शिकार करणं विसरला नाही’, धोनीचा कॅच पाहून चाहत्यांची प्रतिक्रिया
ट्रेंडिंग लेख-
-यंदाच्या आयपीएल हंगामात ‘या’ ३ संघांकडे आहे सर्वोत्तम गोलंदाजीचे आक्रमक
-IPL2020 – या ६ युवा खेळाडूंनी केले सर्वांना प्रभावित, लवकरच मिळू शकते टीम इंडियाकडून खेळण्याची संधी
-IPL – एकही विकेट न गमावता सर्वात मोठ्या धावसंख्येचा यशस्वी पाठलाग करणारे संघ






