शनिवारी आयपीएलच्या 13 व्या हंगामाला सुरुवात झाली, या स्पर्धेत भाग घेणारे जवळपास सर्वच खेळाडू बऱ्याच दिवसानंतर क्रिकेटच्या मैदानात परत येत आहेत. जगातील वेगवान गोलंदाजांपैकी एक असलेला दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेटपटू कागिसो रबाडा मार्चनंतर प्रथमच मैदानात उतरणार आहे. दिल्ली कॅपिटल्स संघाकडून तो खेळणार आहे.
रबाडाने दुबईचे वृत्तपत्र खलीज टाईम्सला सांगितले की आरसीबी संघाचा कर्णधार विराट कोहली, दिग्गज फलंदाज ख्रिस गेल आणि टि20 चा स्टार फलंदाज एबी डिव्हिलियर्स हे तिघेही त्यांच्यासाठी सर्वात मोठे आव्हान असेल.
सामन्यासाठी आहे सज्ज
दक्षिण आफ्रिकेहून दुबईला आल्यावर रबाडा सहा दिवस क्वारंटाईन होता. सहा महिन्यांनंतर त्याने 7 सप्टेंबर रोजी दुबई येथे पहिल्या प्रशिक्षण सत्रात हजेरी लावली होती.
तो म्हणाला, “मी आता पूर्णपणे तयार आहे, तुम्ही तयार आहात की नाही हे तुमच्या मानसिकतेवर अवलंबून असते, मी मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या सामन्यासाठी पूर्णपणे तंदरुस्त आहे.”
गेल्या हंगामात रबाडाने चमकदार कामगिरी केली होती. सहा वर्षांत प्रथमच दिल्ली कॅपिटल्स संघाला प्लेऑफमध्ये स्थान देण्यात त्याने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. गेल्या हंगामात रबाडाने 12 सामन्यात 25 बळी घेतले होते. यंदा दिल्लीचा पहिला सामना आज रात्री 7.30 वाजता किंग्ज इलेव्हन पंजाब संघासोबत होणार आहे. रबाडा म्हणाला की त्याच्या संघाला जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट लीगची सुरूवात सामना जिंकून करायची आहे. दिल्लीला कॅपिटल्स संघ चँपियन बनेल, अशी आशाही त्याने व्यक्त केली होती.
रहाणे सारख्या अनुभवी खेळाडूंच्या आगमनाने संघ झाला बळकट
रबाडाच्या मते, युवा फलंदाज श्रेयस अय्यर यांच्या नेतृत्वाखालील दिल्ली कॅपिटल्स संघात आता तरूण आणि अनुभवी खेळाडूंचे मिश्रण आहे. तो म्हणाला, “हे खरोखर एक उत्तम संयोजन आहे, संघ 22 वर्षाचा ऋषभ पंत ते 25 वर्षांचा श्रेयस अय्यर या तरुणांनी परिपूर्ण आहे. याव्यतिरिक्त संघात अजिंक्य राहणेसारखा अनुभवी खेळाडूदेखील आहे. जर त्यांनी चांगली कामगिरी केली तर ते सामन्याची स्थिती बदलू शकतात.”
यूएई च्या खेळपट्टीबद्दल बोलतांना तो म्हणाला, “युएईमध्ये खेळपट्टीची गती कमी होईल अशी अपेक्षा आहे, त्यामुळे मोठे फटके मारणाऱ्या फलंदाजांना थांबविणे अवघड काम असेल. तसेच गोलंदाजांना चेंडूवर लाळ न लावता गोलंदाजी करणेदेखील कठीण जाईल.”