सध्या भारतात लग्नसराई सुरु आहे. अनेक सेलिब्रेटींच्या लग्नाचे फोटो समोर येत आहेत. यात काही क्रीडापटूही आहेत. त्यातच आता भारताचा आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू राहुल आवारेची देखील भर पडले असून तो देखील लग्नबंधनात अडकला असल्याचे वृत्त समोर येत आहे.
राहुलने रविवारी(३ जानेवारी) अर्जुन पुरस्कार विजेते कुस्तीगीर काकासाहेब पवार यांची कन्या ऐश्वर्या हिच्याशी लग्नगाठ बांधली आहे. काकासाहेब पवार हे देखील कुस्तीपटू असून सध्या त्यांनी भारताला ३१ पदके जिंकून दिली आहेत. तसेच पुण्यात त्यांचे आंतरराष्ट्रीय कुस्ती संकूलही आहे. राहुलने त्यांच्याकडून कुस्तीचे धडेही गिरवले आहेत. त्यामुळे आता या दोघांमध्ये गुरु-शिष्याबरोबर सासरे आणि जावई हे नवे नातेही निर्माण झाले आहे.
विशेषमध्ये राहुलने आपल्या लग्नाच्या मेहंदीमध्ये कुस्ती हे माझे आयुष्य असल्याचे लिहिले आहे. यातून त्याने त्याचे कुस्तीप्रेम दाखवून दिले आहे.
राहुल आणि ऐश्वर्याचा साखरपूडा ऑक्टोबर २०१९ मध्ये पार पडला होता. त्यानंतर आता पुण्यातील बावधान येथे त्यांचा विवाहसोहळा पार पडला आहे. या विवाहसोहळ्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे देखील उपस्थित होत्या. त्याचबरोबर भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे सुद्धा उपस्थित होते. याशिवाय अनेक मान्यवर या विवाहसोहळ्यासाठी उपस्थित होते.
सुप्रिया सुळे यांनी या नवविवाहित जोडप्याला ट्विटरवरुन शुभेच्छा दिल्या आहेत. याशिवाय चंद्रकांत पाटील यांनी देखील ट्विट करत शुभेच्छा दिल्या आहेत.
अर्जुन पुरस्कार विजेते कुस्तीगीर काकासाहेब पवार व सुलक्षणा पवार यांची कन्या ऐश्वर्या व श्री. बाळासाहेब आणि सौ. शारदा आवारे यांचे चिरंजीव डीवायएसपी पैलवान राहुल आवारे यांच्या विवाहास आदरणीय शरद पवार साहेबांसह उपस्थित राहून वधू-वरास आशीर्वाद व शुभेच्छा दिल्या. pic.twitter.com/oHatuWeJ31
— Supriya Sule (@supriya_sule) January 3, 2021
नांदा सौख्य भरे !
आज जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतील कांस्य पदक विजेता कुस्तीपटू राहुल आवारे विवाह बंधनात अडकला. त्याला वैवाहिक जीवनात सुख, समृद्धी व ऐश्वर्य लाभो, यासाठी शुभेच्छा दिल्या. pic.twitter.com/Np9GVmy5uc
— Chandrakant Patil (Modi Ka Parivar) (@ChDadaPatil) January 3, 2021
डिसेंबरमध्ये पुणे ग्रामीणच्या पोलीस उपअधीक्षकपदी नियुक्ती
मुळचा बीडचा असलेल्या राहुल आवारेची डिसेंबर २०२० मध्ये पुणे ग्रामीणच्या पोलीस उपअधीक्षकपदी नियुक्ती झाली आहे. त्याआधी राहुलने एक वर्ष नाशिक येथील पोलीस प्रशिक्षण अकादमीत प्रशिक्षण घेतले होते.
राहुलचे यश –
राहुलला साल २०२० चा अर्जून पुरस्कारही मिळाला आहे. त्याने सन २०१८ ला राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले आहे. तसेच साल २०१९च्या जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत आणि आशियाई कुस्ती चॅम्पियनशीपमध्ये त्याने कांस्यपदक जिंकले आहे. त्याचबरोबर २०१६ ला झालेल्या रिओ ऑलिंपिकमध्येही तो सहभागी झाला होता. आता त्याचे लक्ष्य २०२१ मध्ये होणाऱ्या टोकिओ ऑलिंपिककडे आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
ऑस्ट्रेलियाच्या चिंतेत भर; भारताविरुद्ध २० विकेट्स घेणारा ‘हा’ गोलंदाज सिडनी कसोटीतून बाहेर
‘या’ दोन पाकिस्तानी क्रिकेटर्सचे मजेदार संभाषण झाले स्टंप माईकमध्ये कैद, पहा व्हिडिओ
व्वा रे भावा! केवळ ६ कसोटीत तिसऱ्यांदा घेतल्या डावात ५ विकेट्स