काल(२१ ऑगस्ट) क्रीडा क्षेत्रातील यावर्षीच्या पुरस्कारांसाठी खेळाडूंची अंतिम निवड क्रीडा मंत्रालयाकडून करण्यात आली आहे. यामध्ये अर्जुन पुरस्कारासाठी महाराष्ट्राचा कुस्तीपटू राहुल आवारेला अर्जुन पुरस्कार जाहीर झाला आहे. त्याच्यासह कुस्तीपटू दिव्या काक्रानचीही अर्जुन पुरस्कारासाठी निवड झाली आहे. त्यांच्यासह अन्य क्रीडा प्रकारातील एकूण २७ खेळाडूंना हा पुरस्कार यावर्षी मिळणार आहे.
हा पुरस्कार जाहीर झाल्यानंतर आवारेने ट्विटमार्फत आपल्या भावना व्यक्त केल्या. त्याने ट्विट केले की ‘आपणा सर्वांच्या आशीर्वादाने, आज मला भारत सरकारद्वारे अर्जुन पुरस्कार देण्याची अधिकृत घोषणा झाली! हा माझ्या आयुष्यातील सर्वात आनंदाचा क्षण आहे! भारत सरकार आणि भारतीय क़ुस्ती संघटना व आपण सर्वांचे मनापासुन धन्यवाद…’
आपणा सर्वांच्या आशीर्वादाने, आज मला भारत सरकार द्वारे अर्जुन पुरस्कार देण्याची अधिकृत घोषणा झाली!
हा माझ्या आयुष्यातील सर्वात आनंदाचा क्षण आहे!
भारत सरकार आणि भारतीय क़ुस्ती संघटना व आपण सर्वांचे मनापासुन धन्यवाद…..🙏 pic.twitter.com/Fofb2nad2d— Rahul Aware wrestler#ACP (@rahulbaware1) August 21, 2020
आवारेने २०१८ ला राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले आहे. तसेच २०१९च्या जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत आणि आशियाई कुस्ती चॅम्पियनशीपमध्ये त्याने कांस्यपदक जिंकले आहे.
कुस्तीमध्ये राहुल आणि दिव्या व्यतिरिक्त विनेश फोगट हिला राजीव गांधी खेलरत्न हा क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार जाहीर झाला आहे.
फोगट व्यतिरिक्त क्रिकेटपटू रोहित शर्मा, महिला हॉकी संघाची कर्णधार राणी रामपाल, पॅरा ऍथलिट मरियप्पन थंगवेलू आणि टेबल टेनिसपटू मनिका बात्रा यांना देखील यावर्षीचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार मिळणार आहे.
पुरस्कारासाठी निवड झालेल्या खेळाडूंना २९ ऑगस्ट रोजी पुरस्कार दिला जाईल. २९ ऑगस्ट हा दिवस मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो. यावर्षी पुरस्कर वितरण सोहळा कोरोना व्हायरसमुळे ऑनलाईन होणार आहे.