HAPPY BIRTHDAY RAHUL DRAVID भारतीय क्रिकेट संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक आणि दिग्गज फलंदाज राहुल द्रविड यांचा आज, 11 जानेवारी रोजी, वाढदिवस आहे. द्रविड आज 53 वर्षांचे झाले असून, देशभरातील क्रिकेट चाहते सोशल मीडियावर वेगवेगळ्या अंदाजात त्यांना शुभेच्छा देत आहेत. ‘द वॉल’, ‘मिस्टर वॉल’ या नावांनी ओळखले जाणारे राहुल द्रविड केवळ एक महान खेळाडूच नव्हे, तर एक यशस्वी प्रशिक्षक म्हणूनही त्यांनी भारतीय क्रिकेटचा गौरव वाढवला आहे.
राहुल द्रविड जेव्हा क्रीजवर उभे राहत असत, तेव्हा त्यांचा विकेट मिळवणे गोलंदाजांसाठी मोठे आव्हान ठरायचे. संयम, तांत्रिक शिस्त आणि मानसिक कणखरपणा यांचा उत्तम संगम म्हणजे द्रविड. त्यांच्या नावावर अनेक विक्रम नोंदले गेले आहेत, त्यापैकी काही विक्रम मोडणे आजही अत्यंत कठीण मानले जातात.
राहुल द्रविड यांचे अभेद्ध विक्रम:
1. कसोटी क्रिकेट इतिहासात सर्वाधिक चेंडूंचा सामना करणारा फलंदाज हा मान राहुल द्रविड यांच्याकडे आहे. त्यांनी 164 कसोटी सामन्यांत तब्बल 31,258 चेंडू खेळले. 30 हजारांहून अधिक चेंडू खेळणारे ते जगातील एकमेव फलंदाज आहेत.
2. द्रविड हे असे पहिले फलंदाज ठरले, ज्यांनी सर्व 10 कसोटी खेळणाऱ्या देशांविरुद्ध शतक झळकावले. त्यांच्या कारकिर्दीत असलेल्या प्रत्येक कसोटी राष्ट्रात त्यांनी शतकी खेळी केली होती.
3. कसोटी क्रिकेटमध्ये 300 पेक्षा अधिक धावांची भागीदारी 6 वेळा करण्याचा विक्रमही द्रविड यांच्या नावावर आहे. हा आजही जागतिक विक्रम मानला जातो.
4. वनडे क्रिकेटमध्ये सलग सर्वाधिक डाव शून्यावर न बाद होता खेळण्याचा विश्वविक्रम द्रविड यांनी केला आहे. सातत्य आणि स्थैर्य याचे ते सर्वोत्तम उदाहरण होते.
5. याशिवाय, कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळ क्रीजवर घालवणारा फलंदाज म्हणूनही द्रविड आघाडीवर आहेत. त्यांनी 44,152 मिनिटे कसोटी क्रीजवर व्यतीत केली आहेत.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 24,208 धावा, 48 शतके, 5 द्विशतके आणि 146 अर्धशतके अशी भक्कम कामगिरी त्यांनी केली. 2024 टी-20 विश्वचषक विजेत्या भारतीय संघाचे ते मुख्य प्रशिक्षक होते. 2004 मध्ये आयसीसी क्रिकेटर ऑफ द ईयर, 2013 मध्ये पद्मभूषण आणि 2018 मध्ये आयसीसी हॉल ऑफ फेममध्ये त्यांचा समावेश झाला.






