भारतीय संघाने नुकतेच ऑस्ट्रेलियन संघाला कसोटी मालिकेत धूळ चारली आहे. संघाचे मुख्य गोलंदाज आणि खुद्द कर्णधार विराट कोहली नसताना देखील अजिंक्य रहाणे याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने कसोटी मालिकेत ऑस्ट्रेलिया संघावर २-१ असा दणदणीत विजय मिळवला. या ऐतिहासिक विजयानंतर रहाणे याने आपल्या उत्कृष्ट कामगिरीचे श्रेय पूर्व भारतीय क्रिकेटपटू आणि एनसीएचे अध्यक्ष राहुल द्रविड यांना दिले आहे.
राहुल द्रविड यांनी दिला होता अजिंक्य रहाणेला सल्ला
रहाणेने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिका विजयाचे श्रेय द्रविड यांना दिले आहे. माजी क्रिकेटपटू द्रविड यांनी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाण्यापूर्वी रहाणेला कॉल केला होता. द्रविड यांनी दिलेला सल्ला ऐकून रहाणेला आश्चर्य वाटले होते. परंतु तो सल्ला त्याच्या कामी आला आणि भारतीय संघाने विजयाला गवसणी घातली.
याबद्दल हर्षा भोगले यांना दिलेल्या मुलाखतीत बोलताना रहाणे म्हणाला, “जेव्हा आम्ही दुबई येथून ऑस्ट्रेलियाला रवाना झालो होतो. तेव्हा मला द्रविड यांचा कॉल आला होता. ते म्हणाले तणाव घ्यायची आवश्यकता नाही. मला माहित आहे पहिल्या कसोटीनंतर तू संघाचे कर्णधारपद सांभाळनार आहेस. कुठल्याही गोष्टीचा तणाव घेऊ नकोस. फक्त मानसिक तयारी ठेव आणि नेट्समध्ये जास्त फलंदाजी करू नकोस.”
राहुल द्रविड यांच्या सल्ल्याने मी आश्चर्यचकित झालो होतो- रहाणे
द्रविड यांनी दिलेल्या या अनोख्या सल्ल्यामुळे अजिंक्य रहाणे आश्चर्यचकित झाला होता. “द्रविड मला म्हणाले होते की, त्यांनीसुद्धा नेट्स वर जास्त फलंदाजी करून चुकी केली होती. तुमची तयारी चांगली आहे. फक्त जास्त तणाव घेऊ नका. तू संघासाठी चांगले नेतृत्व कसे करू शकतो या विचारावर जास्त भर दे. तसेच संघाचा आत्मविश्वास कसा वाढवू शकतो यावर लक्ष देर. निकालाची चिंता करु नकोस. तो चांगलाच येणार आहे. नेट्समध्ये जास्त सराव न करण्याच्या सल्ल्यामुळे मला चांगलाच फायदा झाला.” असे रहाणेने पुढे सांगितले.
विराट पालकत्व रजेवर असल्याने रहाणेला नेतृत्वाची संधी
भारताचा नियमित कर्णधार विराट कोहली ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील कसोटी मालिकेच्या पहिल्या सामन्यानंतर पालकत्व रजा घेऊन मायदेशी परतला होता. त्यामुळे या कसोटी मालिकेतील उर्वरित ३ कसोटी सामन्यात रहाणेने भारतीय संघाचे नेतृत्व केले होते.
रहाणेचे यश
ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेत भारताला पहिल्या सामन्यात विराटच्या नेतृत्वाखाली खेळताना पराभवाचा सामना करावा लागला होता. पण त्यानंतर विराटने पालकत्व रजा घेतल्याने उर्वरित सामन्यांत रहाणेने नेतृत्वाची जबाबदारी घेत संघाला मालिकेत पुनरागमन करुन दिले. त्याच्या नेतृत्वाखाली भारताने मेलबर्न आणि ब्रिस्बेन येथे कसोटीत विजय मिळवले, तसेच सिडनी येथे सामना अनिर्णित राखण्यात भारताला यश आले. त्यामुळे भारताने ही मालिका २-१ अशा फरकाने जिंकून इतिहास घडवला.
कौतुकास्पद गोष्ट अशी की या मालिकेदरम्यान भारताचे अनेक प्रमुख खेळाडू दुखापतग्रस्त होत होते. असे असताना एका युवा खेळाडूंच्या संघाने रहाणेच्या नेतृत्वाखाली खेळताना ही मालिका जिंकली. त्यातही ब्रिस्बेन येथे गेल्या ३२ वर्षानंतर पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियाला पराभूत करण्याचा पराक्रमही रहाणेच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने केला होता.
महत्त्वाच्या बातम्या-
विरुष्काच्या लेकीचं नाव आहे खूप खास, जाणून घ्या ‘वामिका’ या नावाचा अर्थ
सानिया मिर्झाने स्पेशल पोस्ट शेअर करत पतीला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, म्हणाली…
नांदेडकरांना लाभणार रोहित शर्मा आणि धवल कुलकर्णीचे मार्गदर्शन, लवकरच सुरू करणार क्रिकेट अकादमी