Indian Coach :- श्रीलंका दौऱ्यापासून गौतम गंभीर याच्या रूपाने भारतीय क्रिकेटमधील नवा अध्याय सुरू होत आहे. मुख्य प्रशिक्षक म्हणून गंभीर 2000 सालानंतर भारताचा आठवा पूर्णवेळ प्रशिक्षक असेल. त्याच्या मार्गदर्शनात भारताकडे पाच आयसीसी ट्रॉफी जिंकण्याची संधी असणार आहे. मात्र, त्याच्यापूर्वी भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहिलेल्या इतर दिग्गजांची कामगिरी कशी होती? यावर एक नजर टाकूया.
भारतीय संघाचे 2000 नंतरचे पहिले पूर्ण वेळ प्रशिक्षक म्हणून न्यूझीलंडच्या जॉन राईट यांनी कार्यभार सांभाळला होता. त्यांच्या कार्यकाळात भारतीय संघाने एकूण 182 आंतरराष्ट्रीय सामने खेळले. भारतीय संघाने 89 विजय मिळवले. तर 71 सामन्यात संघाला पराभव पहावा लागला. त्यांच्या विजयाची टक्केवारी 48.9 इतकी राहिली.
त्यानंतर आलेल्या ग्रेग चॅपेल यांनी 81 आंतरराष्ट्रीय सामन्यात भारतीय संघाला मार्गदर्शन केले. त्यातील 40 सामन्यात संघाने विजय मिळवले तर 31 सामन्यात पराभव पत्करावा लागला. त्यांच्या विजयाची टक्केवारी 49.4 इतकी होती.
दक्षिण आफ्रिकेच्या गॅरी कर्स्टन यांनी 2008 ते 2011 यादरम्यान 144 सामन्यात भारतीय संघाला मार्गदर्शन केले. त्यांच्याच मार्गदर्शनात भारताने विश्वचषक जिंकला. त्यांच्या मार्गदर्शनात भारताने 85 विजय मिळवले. त्यांच्या यशाची टक्केवारी तब्बल 59 टक्के इतकी राहिली. कर्स्टन यांच्यानंतर आलेल्या डंकन फ्लेचर यांची देखील कारकीर्द उत्कृष्ट राहिली. त्यांनी 171 सामन्यात भारतीय संघाला मार्गदर्शन करताना 92 विजय मिळवून दिले. त्यांच्या विजयाची टक्केवारी ही 53 इतकी होती.
त्यानंतर एक वर्षभर भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहिलेल्या अनिल कुंबळे यांच्या देखील विजयाची टक्केवारी ही तब्बल 62 इतकी होती. त्यांच्या मार्गदर्शनात भारतीय संघाने 37 सामने खेळले. कुंबळे यांच्याकडून कार्यभार स्वीकारलेल्या रवी शास्त्री यांची कारकीर्द मोठी राहिली. त्यांनी 2017 ते 2021 या मोठ्या कालावधीत संघाला 184 सामन्यात मार्गदर्शन केले. यामध्ये 121 विजय तर 53 पराभव सामील होते. त्यांच्या विजयाची टक्केवारी 65.8 इतकी राहिली.
भारतीय संघाचे मावळते मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी 2021 ते 2024 या कालावधीत 144 सामन्यात संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून धुरा सांभाळली. यामध्ये तब्बल 103 सामन्यात संघाने विजय मिळवले. त्यांच्या मार्गदर्शनात भारतीय संघाने चार आयसीसी ट्रॉफी अंतिम सामन्यात प्रवेश केला. तर, अखेरच्या सामन्यात भारतीय संघाने टी20 विश्वचषक जिंकत त्यांना निरोप दिला. त्यांच्या कारकिर्दीत भारतीय संघाच्या विजयाची टक्केवारी 71.5 इतकी राहिली.
हेही वाचा-
अर्शदीप सिंगचं नशीब उजळलं, निवडकर्ते देणार कसोटी मालिकेत मोठी संधी?
एका पाठोपाठ श्रीलंकेला दुसरा झटका! भारतासाठी धोकादायक ठरणारा खेळाडू टी20 मालिकेतून बाहेर
ऑलिम्पिक 2024, तिरंदाजीत 36 वर्षांपासून दुष्काळ, यावेळी भारताला पदक मिळणार का?