भारतीय मर्यादीत षटकांचा क्रिकेट संघ सध्या श्रीलंका दौऱ्यावर असून या दौऱ्यात त्यांना ३ वनडे आणि ३ टी२० सामन्यांची मालिका खेळायची आहे. याचवेळी भारताचा कसोटी संघ इंग्लंड दौऱ्यावर आहे. त्यामुळे भारताचे नियमित मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री देखील इंग्लंड दौऱ्यावर गेले आहे. यामुळे श्रीलंका दौऱ्यासाठी माजी क्रिकेटपटू राहुल द्रविडला भारताचा प्रभारी मुख्य प्रशिक्षक म्हणून नेमण्यात आले आहे. दरम्यान, द्रविडला यानंतरही भारताच्या वरिष्ठ संघाचा नियमित प्रशिक्षक करण्यात यावे, यासाठी मागणी होत आहे. मात्र, भारताचा माजी क्रिकेटपटू वासीम जाफरचे याबाबतीत वेगळे मत आहे.
जाफर नेहमीच क्रिकेटमधील विविध विषयांवर आपली मतं व्यक्त करत असतो. नुकतेच त्याने म्हटले आहे की द्रविडने भारतीय संघाचा पूर्णवेळ प्रशिक्षक होऊ नये. जाफरचं मत आहे की द्रविडने राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (एनसीए) , बंगळुरू येथेच राहुन भारताच्या युवा क्रिकेटपटूंना तयार करावे.
जाफर त्याच्या युट्यूब चॅनेलवर बोलताना म्हणाला, ‘तो श्रीलंकेमध्ये भारतीय संघाचे प्रशिक्षकपद सांभाळणार आहे. मला खात्री आहे की युवा खेळाडूंना त्याच्यामुळे खूप फायदा होईल. माझं वैयक्तिक मत आहे की त्याने राष्ट्रीय संघाचा प्रशिक्षक होऊ नये. मला वाटते की त्याने भारताच्या १९ वर्षांखालील आणि भारत अ संघातील खेळाडूंबरोबर एसीए येथे काम करावं. मला वाटतं जो खेळाडू भारतीय संघात खेळतो, तो पूर्णपणे तयार असावा.’
भारताचा कसोटी संघ इंग्लंड दौऱ्यावर असल्याने श्रीलंका दौऱ्यासाठी रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमराह, रविंद्र जडेजा, मोहम्मद शमी असे अनेक अनुभवी खेळाडू अनुपलब्ध आहेत. त्यांच्या अनुपस्थितीत श्रीलंका दौऱ्यासाठी अनेक युवा खेळाडूंना भारतीय संघात संधी मिळाली आहे. तसेच शिखर धवनकडे कर्णधारपद, तर भुवनेश्वर कुमारकडे उपकर्णधारपद सोपवण्यात आले आहे. जाफरला वाटते की द्रविडचे मार्गदर्शन युवा खेळाडूंसाठी महत्त्वाचे ठरेल.
तो पुढे म्हणाला, ‘राहुल द्रविडच्या मार्गदर्शनाची आणि सल्ल्यांची १९ वर्षांखालील संघातील आणि भारत अ संघातील खेळाडूंना जास्त गरज आहे. त्यांना पुढील टप्पा गाठण्यासाठी त्याचे मार्गदर्शन खूप महत्त्वाचे आहे. त्यामुळे मला वाटते की त्याने दीर्घ कालावधीसाठी एनसीएमध्येच थांबावं. ज्यामुळे आपली बेंच स्ट्रेंथ मजबूत होईल.’
तसेच जाफर म्हणाला, ‘ज्याप्रकारे चांगले खेळाडू पुढे येत आहे, त्याचे श्रेय नक्कीच बीसीसीआयला जाते. त्यांनी उत्तम पायाभूत सुविधा आणि मार्ग विकसित केला आहे. भारताकडे आता बरेच राखीव खेळाडू आहेत. याचे श्रेय बीसीसीआयसह राहुल द्रविडलाही जाते, त्याने ज्याप्रकारे एनसीएमध्ये मुख्य प्रशिक्षक म्हणून काम केले आहे आणि ज्याप्रकारे त्याने १९ वर्षांखालील खेळाडूंवर आणि भारत अ संघातील खेळाडूंबरोबर काम केले आहे. राहुल द्रविडपेक्षा उत्तम आदर्श किंवा उत्तम मार्गदर्शक असू शकत नाही.
द्रविडने एनसीएचा प्रमुख म्हणून पदभार स्विकारण्यापूर्वी भारत अ आणि १९ वर्षांखालील भारतीय संघाचे प्रशिक्षकपद सांभाळले आहे. त्याच्याच प्रशिक्षणपदाखाली २०१८ साली १९ वर्षांखालील भारतीय संघाने विश्वचषक जिंकला होता.
महत्त्वाच्या बातम्या –
भारताची आक्रमक फलंदाज शेफाली वर्मा झाली १० वी पास, पाहा किती मिळालेत गुण
टी२० च्या जमान्यात ५७ वर्षापासून अबाधित आहे ‘हा’ विश्वविक्रम, सेहवाग पोहोचला होता सर्वात जवळ
तिरंदाजीपटू दीपिका कुमारी आणि गौतम गंभीर आमने-सामने, तिरंदाजी मैदान तोडण्याचा घातला जातोय घाट