क्रिकेट चाहत्यांची आवडती आणि सर्वात मोठी टी२० लीग म्हणून इंडियन प्रीमिअर लीगची जगात ख्याती आहे. आयपीएलच्या १५व्या हंगामाला सुरुवात झाली आहे. यामध्ये नव्याने २ संघ सामील झाले आहेत, ते म्हणजे लखनऊ सुपर जायंट्स आणि गुजरात टायटन्स होय. या दोन संघांचा पहिला आणि आयपीएल २०२२चा चौथा सामना सोमवारी (२८ मार्च) वानखेडे स्टेडिअम येथे पार पडला. अखेरच्या षटकापर्यंत चाललेल्या या सामन्यात गुजरातने ५ विकेट्सने सामना खिशात घातला. गुजरातचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. मात्र, असे असले तरीही राहुल तेवतिया, डेविड मिलर आणि अभिनव सदारंगानी हेदेखील गुजरातच्या ऐतिहासिक विजयाचे शिल्पकार होते.
या सामन्यात गुजरात संघाचा कर्णधार हार्दिक पंड्याने नाणेफेक जिंकत क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. कर्णधाराने घेतलेला हा निर्णय संघातील खेळाडूंनी योग्य असल्याचे सिद्ध केले. यावेळी प्रथम फलंदाजी करताना लखनऊ संघाने निर्धारित २० षटकांमध्ये ६ विकेट्स गमावत १५८ धावा केल्या होत्या. विजयासाठी मिळालेले १५९ धावांचे आव्हान गुजरात संघाने १९.४ षटकात सहजरीत्या पार केले.
https://twitter.com/gujarat_titans/status/1508512505106079744
गुजरात संघाच्या ऐतिहासिक विजयाचे शिल्पकार
लखनऊ संघाने दिलेले १५९ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना गुजरात संघाची सुरुवात चांगली झाली नाही. संघाचा सलामीवीर फलंदाज शुबमन गिल पहिल्याच षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर तंबूत परतला. पुढे सामन्याच्या तिसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर विजय शंकरच्या रूपात संघाला दुसरा मोठा धक्का बसला. मात्र, त्यानंतर फलंदाजीला कर्णधार हार्दिक पंड्या आला. त्याने टिच्चून फलंदाजी करत धावफलक हलता ठेवला. यावेळी तो ३३ धावांवर खेळत असताना त्याचाच भाऊ आणि लखनऊ संघाचा गोलंदाज कृणाल पंड्याच्या गोलंदाजीवर ११व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर बाद झाला. एका बाजूने सलामीला उतरलेला मॅथ्यू वेड किल्ला लढवत होता. मात्र, त्यालाही फार काळ टिकता आले नाही. तो ३० धावा करून १२व्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर तंबूत परतला. त्यानंतर डेविड मिलर (David Miller) आणि राहुल तेवतियाने (Rahul Tewatia) आपली विस्फोटक खेळी दाखवली. त्यांनी ६० धावांची भागीदारी केली. यामध्ये मिलरच्या २७, तर तेवतियाच्या ३२ धावांचा समावेश होता.
पुढे मिलर ३० धावा करत आवेश खानच्या गोलंदाजीवर १७.३ षटकात बाद झाला. त्यानंतर संघाला विजयी सलामी देण्यासाठीअभिनव सदारंगानी (Abhinav Sadarangani) उतरला. दुसरीकडे तेवतिया होताच. तेवतिया आणि सदारंगानी यांनी फक्त २३ धावांची, पण संघाला विजय मिळेल अशी उपयुक्त खेळी केली. यात तेवतियाच्या ८, तर सदारंगानीच्या १५ धावा होत्या. त्यांच्या या योगदानाच्या जोरावर गुजरातने १९.४ षटकातच सामना खिशात घातला. महत्त्वाचं म्हणजे सदारंगानी हा केएल राहुलचा गाववाला आहे. केएल राहुल आणि सदारंगानी यांचा जन्म कर्नाटकचा आहे. दोघेही देशांतर्गत क्रिकेटमध्ये कर्नाटक संघासाठी खेळतात.
अशाप्रकारे गुजरातची शेपटी असलेल्या डेविड मिलर, राहुल तेवतिया आणि अभिनव सदारंगानी या तीन खेळाडूंनी आपल्या संघाला विजय मिळवून देण्यासाठी प्रशंसनीय खेळी केली.
आयपीएलच्या १५व्या हंगामातील गुजरात टायटन्सचा हा पहिलाच विजय होता. आता आयपीएलचा पाचवा सामना मंगळवारी (२९ मार्च) पुण्याच्या एमएसीए स्टेडिअम येथे सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध राजस्थान रॉयल्स संघात खेळला जाणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
आयपीएलमध्ये इतक्या फ्रँचायझी, त्यांचे इतके बॉलर… पण शमीने गुजरातसाठी जे केले ते ऐतिहासिकच
छोटा पॅकेट बडा धमाका! गुजरातविरुद्ध वादळी खेळी करणारा आयुष बदोनी आहे तरी कोण? पंड्यालाही फोडलाय घाम
व्हॉट अ स्टार्ट! शमीने सर्वांच्याच उंचावल्या भुवया, पहिल्याच चेंडूवर लखनऊचा कर्णधार ‘गोल्डन डक’






