काल(24 मार्च) मुंबई इंडियन्स विरुद्ध खेळताना दिल्ली कॅपिटल्सने आपला आयपीएलचा १२ व्या मोसमातील पहिलाच सामना जिंकून आयपीएलची २०१९ ची दिमाखदार सुरुवात केली आहे. रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्स विरुद्ध खेळताना दिल्लीचा विस्फोटक फलंदाज रिषभ पंतने २७ चेंडूत ७८ धावांची विक्रमी खेळी केली आणि संघाला एकहाती विजय मिळवून दिला.
रिषभ पंतबरोबरच दिल्लीचा फिरकी गोलंदाज राहुल तेवतीयासुद्धा काल चर्चेत आला तो त्याच्या गोलंदाजीमुळे नाही तर क्षेत्ररक्षणामुळे. तेवतीयाने एकाच सामन्यात चार झेल घेण्याच्या विक्रमला गवसणी घातली आहे.
विशेष म्हणजे याअगोदर आयपीएलमध्ये एका सामन्यात चार झेल घेण्याचा हा विक्रम मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, डेविड वॉर्नर आणि जॅक कॅलिस या दिग्गजांच्या नावे आहे. त्यामुळे आयपीएलमध्ये एका सामन्यात चार झेल घेणारा तेवतीया हा चौथा खेळाडू बनला आहे.
२१४ धावांचा पाठलाग करताना मुंबई संघ १७६ धावांवरच गारद झाला. अर्थातच या सगळ्याचे श्रेय दिल्लीच्या गोलंदाजांना जाते. पण त्याचबरोबर तेवतीयाचे क्षेत्ररक्षणामधील योगदानही विसरून चालणार नाही. त्याने, रोहित शर्मा, युवराज सिंग, कायरन पोलार्ड आणि मिचेल मॅक्लेनघन यांचे झेल घेतले.
दिल्लीकडून पंतच्या ७८ धावा सोडता शिखर धवन (३६ चेंडूत ४३ धावा) आणि कॉलिन इन्ग्रॅमच्या (३२ चेंडूत ४७ धावा) यांचे दिल्लीच्या धावसंख्येत महत्वाचे योगदान होते. मुंबईकडून गोलंदाजीमध्ये मिचेल मॅक्लेनघनने ४ षटकांत ४० धावा देत ३ फलंदाज बाद केले.
मुंबईकडून सामन्याची सुरुवात अतिशय संथ गतीने झाली, रोहित शर्मा १३ चेंडूत १४ धावांवर स्वस्तात तंबूत परतला. पाठोपाठ सूर्यकुमार यादव २ धावांवर बाद झाला.
सर्वांचे आकर्षण असलेल्या युवराज सिंगने मात्र ३५ चेंडूत ५३ धावांची खेळी साजरी केली. पण त्याची ही खेळी व्यर्थ गेली आणि मुंबईला ३७ धावांच्या लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले. दिल्लीकडून इशांत शर्मा आणि कागिसो राबाडाने प्रत्येकी २-२ बळी घेतले.
महत्त्वाच्या बातम्या-
–आयपीएल २०१९: राजस्थान विरुद्ध पंजाब- या ५ क्रिकेटर्सच्या कामगिरीकडे राहणार चाहत्यांचे लक्ष..
–एका वर्षानंतर पुनरागमन करणाऱ्या स्टिव्ह स्मिथ विषयी पंजाबच्या कर्णधार अश्विनने केले हे विधान..