काहीदिवसांपूर्वी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने १२ मार्चपासून सुरु होणाऱ्या भारत विरुद्ध इंग्लंड टी२० मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली. या १९ जणांच्या भारतीय संघात काही नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली. यामध्ये २७ वर्षीय राहुल तेवतियाचाही समावेश आहे. त्यामुळे आता तेवतिया आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करण्यास सज्ज झाला आहे. नुकतेच त्याने त्याला जेव्हा भारतीय संघातील निवडीबद्दल कळाले, तेव्हा काय भावना होत्या, याबद्दल खुलासा केला आहे.
तेवतियाने सांगितले की त्याला भारतीय संघात त्याची निवड झाली ही बातमी हरियाणा संघातील त्याचे संघसहकारी युजवेंद्र चहल आणि मोहित शर्माकडून समजले. सध्या तेवतिया हरियाणा संघासह विजय हजारे ट्रॉफी स्पर्धा खेळण्यात व्यस्त आहे.
द इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार तेवतिया म्हणाला, ‘जेव्हा युझी भाईने (चहलने) मला निवडीसंबंधी सांगितले तेव्हा मला पहिल्यांदा वाटले की तो माझी मजाच करत आहे. मला वाटलेच नव्हते की माझी आत्ता निवड होईल. मोहित भैय्या पण माझ्या खोलीत मला निवडीसंबंधी सांगण्यास आला होता.’
तेवतिया पुढे म्हणाला, ‘आयुष्याने नेहमीच आव्हाने दिली आहेत. हरियाणा संघात आधीच अमित मिश्रा, चहल आणि जयंत यादव हे तीन फिरकीपटू आहेत, ज्यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. मला नेहमीच माहित होते की मला संधी मिळाली तर मी ती संधी दवडणार नाही. आयपीएलनंतर लोकांचे माझ्याकडे लक्ष वेधले गेले. मी विचार केला की जर मी चांगला खेळ कायम ठेवला तर माझी भारतीय संघात निवड होईल.’
तसेच भारतीय ड्रेसिंग रुममध्ये प्रवेश करण्याबद्दल तेवतिया म्हणाला, ‘अनेक वरिष्ठ खेळाडूंसह ड्रेसिंग रुम शेअर करणे शानदार असेल. त्यांना जवळून पाहायची संधी मिळेल. मी ऐकले आहे की भारतीय संघातील ड्रेसिंग रुमचा अनुभव खुप वेगळा असतो. संघ व्यवस्थापनाने आणि निवड समीतीने माझ्यावर विश्वास दाखवला आहे.’
आयपीएल २०२० दरम्यान आला होता प्रकाशझोतात
तेवतिया आयपीएल २०२० च्या हंगामादरम्यान प्रकाशझोतात आला होता. त्याने राजस्थान रॉयल्सकडून खेळताना किंग्स इलेव्हन पंजाबविरुद्ध (आताचे नाव पंजाब किंग्स) ३१ चेंडून नाबाद ५३ धावा फटकावल्या होत्या. यातील ३० धावा त्याने एकाच षटकात ५ षटकार मारत काढल्या होत्या. त्यानंतर त्याला बरीच प्रसिद्धी मिळाली. तसेच त्याने या हंगामात चांगली कामगिरी करताना १४ सामन्यात २५५ धावा आणि १० विकेट्स घेतल्या होत्या.
विजय हजारे ट्रॉफीमध्येही तेवतिया फॉर्ममध्ये
सध्या सुरु असलेल्या विजय हजारे ट्रॉफीमध्ये तेवतियाने हरियाणाकडून चंदिगढ़ विरुद्ध खेळताना ३९ चेंडूत ४ चौकार आणि ६ षटकारांसह ७३ धावा केल्या होत्या. तसेच गोलंदाजीत २ विकेट्सही घेतल्या होत्या.
महत्त्वाच्या बातम्या –
राशिद खानच्या जबरा ‘हेलिकॉप्टर शॉट’ने परदेशी क्रिकेटरला लावले वेड; म्हणाली, “मलाही शिकव”
भारतात जन्मला असता तर जॅक कॅलिस ‘क्रिकेटचा देव’ असता!!
अन् ‘तिला’ पाहून सूर्यकुमार झाला क्लीन बोल्ड! अशी आहे ‘लव्हस्टोरी’