---Advertisement---

ऐतिहासिक षटकार ठोकताना काय होती राहुल त्रिपाठीची मनस्थिती? स्वतः केला खुलासा

On: गुरूवार, ऑक्टोबर 14, 2021 3:46 PM
---Advertisement---

इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) चौदाव्या हंगामातील दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात बुधवारी (१३ ऑक्टोबर) दिल्ली कॅपिटल्सचा सामना शारजाह क्रिकेट स्टेडियमवर कोलकाता नाईट रायडर्सशी झाला. या सामन्यात कोलकाताने ३ गडी राखून थरारक विजय मिळवत तिसऱ्यांदा अंतिम फेरीत प्रवेश केला. कमालीच्या नाट्यमय झालेल्या या सामन्यात कोलकातासाठी राहुल त्रिपाठीने अखेरपर्यंत संयम राखत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. यासह कोलकाता तब्बल सात वर्षांनंतर आयपीएलचा अंतिम सामना खेळेल. या उत्कंठावर्धक सामन्यात एका बाजूने गडी बाद होत असताना आपली मनस्थितीत काय होती याबाबत राहुलने खुलासा केला.

काय म्हणाला राहुल
सोळाव्या षटकाच्या अखेरपर्यंत कोलकाताचा विजय अतिशय सोपा वाटत असताना दिल्लीच्या गोलंदाजांनी २३ चेंडूत अवघ्या सात धावा देत सहा फलंदाज बाद केले. अखेरच्या दोन चेंडूवर विजयासाठी 6 धावांची आवश्यकता असताना, राहुल त्रिपाठीने रविचंद्रन अश्विनला षटकार ठोकत सामना कोलकात्याच्या पारड्यात टाकला. या मॅचविनिंग खेळीनंतर बोलताना राहुल म्हणाला,
“हा विजय संघासाठी अत्यावश्यक होता. मला वाटलेही नव्हते की सामना इतका चुरशीचा होईल. ती दोन षटके अत्यंत दर्जेदार होती. मात्र, मला आनंद आहे की सामना आम्ही जिंकला. रबाडाने १८ वे षटक अप्रतिम टाकले होते. मला माहित होते की फिरकी गोलंदाज गोलंदाजीला येईल तेव्हा एक मोठा फटका सामना जिंकून देईल. अखेरीस तसेच झाले. पाचव्या चेंडूवर दोन धावांची संधी असती तर, मी ती देखील साधली असती. मी शेवटपर्यंत स्वतःला समजावत होतो की, आपण विजयापासून एक फटका दूर आहोत.”

रोमहर्षक सामन्यात केकेआरचा विजय
शारजा येथे झालेल्या या सामन्यात दिल्लीने प्रथम फलंदाजी करताना श्रेयस अय्यर व शिखर धवन यांच्या छोटेखानी खेळ्यांच्या जोरावर १३५ धावा उभ्या केल्या. प्रत्युत्तरात, व्यंकटेश अय्यर व शुबमन गिल यांनी ९६ धावांची सलामी देत सामना केकेआरच्या बाजुने वळविला. त्यानंतर दिल्लीच्या गोलंदाजांनी झटपट ४ बळी मिळवत सामन्यात रंगत निर्माण केली. मात्र, राहुल त्रिपाठीने अखेरपर्यंत धैर्य दाखवात सामना संघाच्या नावे केला. अर्धशतकी खेळी करणारा सलामीवीर व्यंकटेश अय्यर याला सामनावीर पुरस्कार देण्यात आला. अंतिम सामना चेन्नईविरुद्ध दुबई येथे शुक्रवारी खेळला जाईल.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---