---Advertisement---

MPL 2025: रायगड रॉयल्स पहिल्यांदाच खेळणार प्ले ऑफ्स, असा केला टॉप 4 पर्यंत प्रवास

On: गुरूवार, जून 19, 2025 9:29 PM
---Advertisement---

महाराष्ट्र प्रीमियर लीग 2025 च्या साखळी फेरीची अखेर झाली असून, प्ले ऑफ्समध्ये प्रवेश केलेल्या चारही संघाबाबत स्पष्टता आली आहे. साखळी फेरीच्या अखेरच्या दिवशी चौथ्या संघाने प्ले ऑफ्समध्ये जागा निश्चित केली. साखळी फेरीत तिसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या रायगड रॉयल्स संघाने हा प्रवास कसा पूर्ण केला, यावर एक नजर टाकूया.

रायगड रॉयल संघाने पहिल्या दोन हंगामात निराशाजनक कामगिरी केली. या दोन्ही हंगामात त्यांना पहिल्या चारमध्ये पोहोचता आले नव्हते. यावेळी लिलावानंतर मजबूत संघ त्यांनी बांधला. ऋषभ राठोड त्याच्या नेतृत्वात खेळणाऱ्या या संघाने पहिल्या सामन्यात सातारा वॉरियर्सचे आव्हान स्वीकारले. स्वतः कर्णधार ऋषभ याने 80 धावांची खेळी करत आपल्या संघाला 190 पर्यंत पोहोचवलेले. त्यानंतर गोलंदाजांनी उत्कृष्ट कामगिरी करत रायगडला 24 धावांनी हंगामातील पहिला विजय मिळवून दिला. पहिल्या सामन्यात विजय मिळवल्यानंतर दुसऱ्या सामन्यात पुणेरी बाप्पाने त्यांना मोठा दणका दिला. तब्बल 99 धावांनी रायगडला दुसऱ्या सामन्यात पराभूत व्हावे लागले.

रत्नागिरी जेट्सविरुद्ध तिसरा सामना खेळताना देखील त्यांची सांघिक कामगिरी होऊ शकली नाही. रत्नागिरी संघाने 67 धावांनी त्यांच्यावर मात करत आपला पहिला विजय नोंदवलेला. चौथ्या सामन्यात रायगडने शानदार कमबॅक करत सिद्धेश वीर याच्या शतकाचा जोरावर हंगामातील सर्वोच्च 216 ही धावसंख्या उभी केली. हा सामना रायगडने डकवर्थ लुईस नियमानुसार 5 धावांनी आपल्या नावावर केला. हीच विजयी लय कायम राखत त्यांनी पुणेरी बाप्पाला 2 गडी राखून पराभूत केले. सागर जाधव याने एकाच षटकात तीन षटकार मारून संघाला विजयी केलेले.

हंगामातील सहावा सामना खेळताना त्यांना पुन्हा एकदा पराभव स्वीकारावा लागला. अत्यंत अटीतटीच्या झालेल्या सामन्यात पीबीजी कोल्हापूर टस्कर्स संघाने दोन विकेट्सने विजय मिळवला. यानंतर कोकण डर्बीच्या दुसऱ्या फेरीचा सामना पावसामुळे रद्द केला गेला. या सामन्यात रायगड व रत्नागिरी या दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण देण्यात आला. सातारा वॉरियर्स विरुद्ध हंगामातील आठवा सामना प्रत्येकी दहा षटकांचा खेळला गेला. डकवर्थ लुईस नियमानुसार दोन धावांनी निर्णायक विजय मिळवत, त्यांनी प्ले ऑफ्समधील आपल्या जागेवर मोठा दावा केला.

ईगल नाशिक टायटन्सविरूद्धच्या नवव्या सामन्यात रायगड रॉयल्स 6 बाद 111 असे पिछाडीवर होते. मात्र, त्यानंतर पावसाचे आगमन झाले. पुढे सामना न झाल्याने दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण देण्यात आला. याच एका गुणासह त्यांनी प्ले ऑफ्समध्ये प्रवेश निश्चित केला. पीबीजी कोल्हापूर टस्कर्सविरूद्धचा त्यांचा अखेरचा सामना पावसामुळे रद्द झाला.

रायगड रॉयल्स स्पर्धेतील एलिमिनेटर सामना 20 जून रोजी खेळेल. पीबीजी कोल्हापूर टस्कर्सविरूद्ध होणारा हा सामना सायंकाळी 7 वाजता खेळला जाईल. या सामन्यातील विजेता संघ क्वालिफायर 2 मध्ये खेळेल. पावसामुळे सामना रद्द झाल्यास रायगड रॉयल्स क्वालिफायर 2 मध्ये दाखल होतील.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---