---Advertisement---

MPL 2025: रायगडचे हे पाच ‘रॉयल्स’ ठरणार गेमचेंजर

On: शनिवार, मे 31, 2025 10:58 PM
---Advertisement---

एमपीएल 2025 सुरू होण्यासाठी अगदी तीन दिवस बाकी आहेत. महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या या महत्वकांक्षी टी20 लीगसाठी सर्व चाहते आतुर आहेत. पहिल्या दोन हंगामात फारशी चमकदार कामगिरी न करू शकलेल्या रायगड रॉयल्स (Raigad Royals) संघाला यावर्षी मोठ्या अपेक्षा आहेत. या संघातील पाच असे खेळाडू आहेत, ज्यांच्या खेळावर रायगडचा प्रवास अवलंबून असणार आहे.

सिद्धेश वीर (Siddhesh Veer)- महाराष्ट्र संघाचा अनुभवी फलंदाज सिद्धेश वीर हा सलग तिसऱ्या वर्षी रायगड रॉयल्स संघासाठी खेळताना दिसणार आहे. त्यानेच पहिल्या दोन्ही हंगामात संघासाठी सर्वाधिक धावा बनवल्या आहेत. त्यामुळे यावर्षी देखील त्याच्यावर फलंदाजीची मदार असेल. सिद्धेश रायगड संघासाठी सलामीला येत जबाबदारीने खेळण्यात माहीर आहे.

हितेश वाळुंज (Hitesh Walunj)- महाराष्ट्र संघाचा प्रमुख फिरकीपटू असलेला हितेश वाळुंज तिसऱ्या हंगामात रायगड रॉयल्स संघाचा भाग असणार आहे. आपल्या डावखुऱ्या फिरकीने व आक्रमक फटकेबाजीने तो संघाच्या विजयात मोठे योगदान देऊ शकतो. लिलावात मोठी रक्कम देत रायगडने‌ त्याला आपल्या संघाचा भाग बनवले आहे. यावेळी विकी ओस्तवाल याच्यासोबत मिळून तो रायगडच्या फिरकीची बाजू सांभाळेल.

तनय संघवी (Tanay Sanghavi)- युवा गोलंदाज तनय संघवी याने दुसऱ्या हंगामात आपल्या खेळाने सर्वांची मने जिंकली होती. त्याने या हंगामात केवळ आठ सामने खेळताना वीस फलंदाजांना बाद केलेले. त्यामुळे संघाच्या गोलंदाजीचा तो महत्त्वाचा भाग असेल. रायगडच्या वेगवान गोलंदाजीची धुरा त्याच्या युवा खांद्यावर असणार आहे. रायगड संघाच्या यशात तो मोठा वाटा उचलू शकतो.

विकी ओस्तवाल (Vicky Ostwal)- पहिल्या हंगामापासून रॉयल्सचा आयकॉन खेळाडू असलेला फिरकीपटू विकी ओस्तवाल हा संघाच्या प्रमुख स्तंभांपैकी एक आहे. कर्णधार ऋषभ राठोड व यावेळी संघाचा भाग बनलेल्या हितेश वाळुंज यांच्यासह तो फिरकी गोलंदाजीचा भार सांभाळेल. पहिल्या दोन हंगामात आलेले अपयश विसरून, संघाला प्ले ऑफ्समध्ये घेऊन जाण्याचे पहिले कार्य त्याला करावे लागेल.

दिग्विजय पाटील (Digvijay Patil)- महाराष्ट्र क्रिकेटमधील उदयोन्मुख फलंदाज असलेला दिग्विजय पाटील तिसऱ्या हंगामात रायगड संघात सामील झाला आहे. लिलावाआधी रायगडने छत्रपती संभाजी किंग्सकडून त्याला ट्रेड केले होते. स्टायलिश फलंदाजी आणि कमालीचा क्षेत्ररक्षक असलेला दिग्विजय यावेळी संघात नवचैतन्य आणू शकतो. त्याच्या फलंदाजीवर रायगडच्या यशाचे प्रमाण बऱ्यापैकी अवलंबून असेल.

एमसीए अध्यक्ष आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी सांगितल्याप्रमाणे, यंदा एमपीएल 2025 सोबत प्रथमच डब्ल्यूएमपीएल (WMPL) ही महिलांची लीग देखील होणार आहे. अशाप्रकारे लीग खेळवणारी एमसीए देशातील पहिली संघटना आहे. या दोन्ही स्पर्धा पुण्याजवळील गहुंजे येथील आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या जातील. या दोन्ही स्पर्धांसाठी प्रेक्षकांना मोफत प्रवेश दिला जाणार आहे. JioHotstar OTT आणि Star Sports 2 टीव्ही चॅनलवर या स्पर्धा पाहता येतील. (MPL 2025 Live Telecast On JioHotstar OTT And Star Sports 2 TV Channel)

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---