---Advertisement---

बटलर-स्टोक्सच्या जागी राजस्थान रॉयल्समध्ये २ नव्या खेळाडूंची एन्ट्री; एकाने ठोकलेत ३३७ षटकार

On: बुधवार, सप्टेंबर 1, 2021 11:20 AM
---Advertisement---

आयपीएलच्या १४ व्या हंगामातील उर्वरित सामने १९ सप्टेंबरपासून सुरू होत आहेत. या सामन्यांचे आयोजन यूएईमध्ये केले गेले आहे. स्पर्धेतील काही संघ सरावासाठी यूएईत दाखल झाले आहेत. अशात आयपीएल फ्रँचायझी राजस्थान राॅयल्सला दोन मोठे झटके लागले आहेत. संघाचे दोन अप्रतिम फलंदाज जोस बटलर आणि बेन स्टोक्स स्पर्धेच्या १४ हंगामातील उर्वरित सामन्यात सहभागी होणार नाहीत. संघाने या गोष्टीची पुष्टीही केली आहे. सोबतच त्यांनी या दोन खेळाडूंच्या जागी वेस्टइंडीजचे एविन लुईस आणि ओशेन थाॅमस यांना संघात सामील केले आहे.

बटलर लवकरच वडील बनणार असल्याने उर्वरित सामन्यांत सहभागी होणार नाही. त्याच्या बाळाच्या जन्मावेळी तो त्याच्या पत्नीसोबत थांबणार आहे. तसेच स्टोक्स मानसिक आरोग्याच्या कारणास्तव स्पर्धेत सहभाग घेणार नाही. आयपीएलच्या या हंगामातील भारतात खेळल्या गेलेल्या सामन्यातही त्याला खेळता आले नव्हते. त्यावेळी त्याला हाताच्या करंगळीला दुखापत झाली होती.

बटलरच्या जागी संघात आलेला लुईस याआधी मुंबई इंडियन्स संघासाठी खेळला आहे. त्याने आतापर्यंत १६ आयपीएल सामने खेळताना ४३० धावा केल्या आहेत. त्याच्या नावे आयपीएलमध्ये २ अर्धशतके आणि २६ षटकारांची नोंद आहे. इतकेच नव्हे तर, त्याने ट्वेंटी ट्वेंटी क्रिकेटमध्ये आपल्या विस्फोटक फलंदाजीचा ठसा उमटवला आहे. त्याने १७४ ट्वेंटी ट्वेंटी सामने खेळताना ३३७ षटकारांसह ४९३४ धावा चोपल्या आहेत.

याव्यतिरिक्त स्टोक्सच्या जागी संघात आलेला थॉमस यापूर्वीही राजस्थान संघाचा भाग राहिला आहे. त्याने २०१९ मध्ये ४ आयपीएल सामने खेळताना ५ विकेट्स घेतल्या आहेत. तसेच १७ आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळताना १९ विकेट्सची कामगिरी केली आहे.

राजस्थान राॅयल्स संघाने याआधी आयपीएलच्या चालू हंगामाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज ऍंड्र्यू टाईच्या जागी दक्षिण अफ्रिकेचा तबरेज शम्सीला संघात सामील केले होते. आस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज ऍंड्र्यू टाईने कुटुंबासोबत वेळ घालवण्यासाठी आयपीएलच्या या १४ व्या हंगामातून नाव माघारी घेतले होते.

तबरेज शम्सी टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये क्रमांक एकचा गोलंदाज आहे. शम्सीने वर्ष २०१७ मध्ये इंग्लंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात दक्षिण अफ्रिका संघासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. या डाव्या हाताच्या लेग स्पिनरने ३९ टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ४५ विकेट्स घतल्या आहेत. तसेच २७ एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ३२ विकेट्स घेतल्या आहेत. आयपीएल २०१६ मध्ये शम्सी राॅयस चॅलेंजर्स बेंगलोर संघासाठी चार सामने खेळला होता. यामध्ये त्याने तीन विकेट्स घेतल्या होत्या.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---