आयपीएल २०२१ च्या दुसऱ्या टप्प्यात ४० वा सामना सोमवारी (२७ सप्टेंबर) खेळला गेला. या सामन्यात राजस्थान राॅयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद हे संघ एकमेकांसमोर होते. या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने सात विकेट्स राखून विजय मिळवला आहे. सामन्यात प्रथम फलंदाजी करताना राजस्थान राॅयल्सने १६५ धावा केल्या होत्या. यामध्ये त्यांचा कर्णधार संजू सॅमसन आणि यशस्वी जयस्वाल यांनी चांगल्या फलंदाजीचे प्रदर्शन केले. मात्र, लियाम लिव्हींगस्टोन पुन्हा एकदा चांगली खेळी करण्यामध्ये अपयशी ठरला आहे.
उत्तुंग षटकारांसाठी प्रसिद्ध आहे लिव्हींगस्टोन
इंग्लंडमध्ये आपल्या दमदार खेळाने सर्वांना वेड लावणारा आणि मोठ मोठे शाॅट खेळण्यासाठी लिव्हींगस्टोन ओळखला जातो. या कारणामुळे चाहत्यांमध्ये तो ‘सिक्स हिटिंग मशीन’ या नावाने परिचित आहे. मात्र, आयपीएलमध्ये तो अपेक्षित कामगिरी करू शकलेला नाही. काल झालेल्या सनरायझर्सविरुद्धच्या सामन्यातही त्याचा खराब फॉर्म कायम दिसला आहे.
पुन्हा एकदा ठरला अपयशी
हैदराबादविरुद्धच्या सामन्यात लिव्हींस्टोनकडे आपला खेळ सुधारण्याची चांगली संधी होती. मात्र, चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आल्यानंतर तो राशिद खानच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्याच्या एका चेंडूला मैदानाबाहेर मारण्याच्या नादात त्याने मोठा फटका खेळला. मात्र, चेंडू मैदानाबाहेर गेला नाही आणि डीप मिडविकेटवर क्षेत्ररक्षणासाठी उभा असलेला अब्दुल समद याने सहज त्याचा झेल घेतला.
राशिद खानच्या चेंडूवर बाद होण्यापूर्वी त्याने केवळ सहा चेंडूंचा सामना केला होता आणि यामध्ये अवघ्या चार धावा केल्या होत्या. लिव्हींस्टोनचे सततचे खराब प्रदर्शन राजस्थान राॅयल्सच्या अडचणी वाढवत आहे. संघासाठी त्याने पुढच्या सामन्यात चांगले प्रदर्शन करणे आवश्यक असणार आहे.
सनरायझर्सचा दुसरा विजय
या सामन्यात राजस्थान राॅयल्सचा कर्णधार संजू सॅमरनने ५७ चेंडूत ८२ धावा करून संघासाठीसाठी सन्मानजनक धोवसंख्या उभारण्यात महत्वाचे योगदान दिले. हैदराबादने सलामीवीर फलंदाज जेसन राॅयच्या ४२ चेंडूत ६० आणि कर्णधार केन विलियम्सनने ४१ चेंडूत ५१ धावांच्या खेळीच्या जोरावर सामन्यात विजय मिळवला.