---Advertisement---

अंतिम षटकात संजू सॅमसनची ‘ती’ चूक भोवली, पंजाबची अवघ्या ४ धावांनी राजस्थानवर मात

On: मंगळवार, एप्रिल 13, 2021 11:16 AM
---Advertisement---

राजस्थान रॉयल्स संघाने इंडियन प्रीमियर लीगच्या १४ व्या हंगामासाठी संजू सॅमसन याला कर्णधारपदाची जबाबदारी दिली आहे. सोमवारी (१२ एप्रिल) झालेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्स विरुद्ध पंजाब किंग्ज यांच्यात सामना रंगला होता. हा सामना शेवटच्या चेंडूपर्यंत गेला होता. संजू सॅमसनने एकहाती झुंज सामना शेवटच्या चेंडूपर्यंत नेला होता. परंतु संजू सॅमसनची एक चूक राजस्थान रॉयल्स संघाला महागात पडली.

या सामन्यात राजस्थान रॉयल्स संघाने नाणेफेक जिंकून पंजाब किंग्ज संघाला प्रथम फलंदाजी करण्याचे आमंत्रण दिले होते. प्रथम फलंदाजी करताना पंजाब किंग्ज संघाकडून कर्णधार केएल राहुल याने ९१ धावांची तुफानी खेळी केली होती. यासोबतच दीपक हुड्डाने सुद्धा चौफेर फटकेबाजी करत ६४ धावांची खेळी केली होती. तसेच ख्रिस गेल याने ४० धावांचे योगदान दिले होते. या खेळीच्या जोरावर पंजाब किंग्ज संघाने २० षटक अखेर २२१ धावांपर्यंत मजल मारली होती.

एक चूक पडली महागात
पंजाब किंग्ज संघाने दिलेल्या २२२ धावांचा पाठलाग करताना, राजस्थान रॉयल्स संघाच्या सलामी फलंदाजांनी लवकर नांगी टाकली होती. त्यानंतर डाव सांभाळण्याची जबाबदारी कर्णधार संजू सॅमसनवर आली होती. सॅमसनने ११९ धावांची खेळी केली. परंतु त्याला संघाला विजय मिळवून देण्यात अपयश आले होते. तर झाले असे की, १९ षटकापर्यंत तुफान फटकेबाजी करणाऱ्या संजू सॅमसन ने २० व्या षटकात मोठी चूक केली.

शेवटच्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर सॅमसनने एक धाव घेतली. त्यानंतर मॉरिसने देखील एक धाव घेतली. चौथ्या चेंडूवर सॅमसनने षटकार लगावला होता. त्यांनतर राजस्थान रॉयल्स संघाला २ चेंडूत ५ धावांची आवश्यकता असताना संजू सॅमसनने लाँग ऑफच्या दिशेने शॉट खेळला होता. त्या चेंडूवर संजूने धाव घेण्यास नकार दिला होता. जर त्याने त्या चेंडूवर १-२ धावा घेतल्या असत्या. तर शेवटच्या चेंडूवर ३ किंवा ४ धावांची आवश्यकता असती. त्यानंतर शेवटच्या चेंडूवर चौकार मारून देखील सामना जिंकता आला असता.

यावेळी शेवटच्या चेंडूवर ५ धावांची आवश्यकता असताना, संजू सॅमसन झेलबाद झाला आणि सामना राजस्थान रॉयल्स संघाने गमावला.

महत्त्वाच्या बातम्या-

मोठ्या मनाचा कर्णधार! स्वत:ला नव्हे तर ‘या’ २ खेळाडूंना दिले पंजाब किंग्जच्या विजयाचे श्रेय

Video: झेल घेण्याच्या प्रयत्नात शमी-राहुलची जोरदार धडक, कर्णधाराची रिऍक्शन होती पाहण्यासारखी

पंजाब किंग्जच्या नव्या जर्सीची नेटकऱ्यांनी केली थट्टा; चहलही म्हणाला, ‘वेलकम टू आरसीबी बॉइज’

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---