आयपीएल फ्रेंचायझी राजस्थान रॉयल्सचा फिरकी गोलंदाज श्रेयस गोपाल लग्नाच्या बंधनात अडकला आहे. बुधवारी (२४ नोव्हेंबर) त्याने प्रेयसी निकिता शिवसोबत लग्न गाठ बांधली. गोपालने स्वतः प्रेयसीसोबत लग्न केल्याची माहिती दिली आहे. त्याने स्वतःच्या अधिकृत इंस्टाग्राम खात्यावरून लग्नाचा फोटो शेअर केला.
गोपालने इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या पोस्टवर चाहते वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. तसेच कमेंट्सच्या माध्यमातून त्याला वैवाहिक आयुष्याच्या शुभेच्छाही देत आहेत. इंस्टाग्राम पोस्टच्या कॅप्शनमध्ये गोपालने लग्नाची तारीख लिहिली आहे, ‘२४-११-२०२१.’ तसेच त्याने हॅशटॅगच्या माध्यमातून लिहिले आहे की, “निकिने होकार दिला आहे.” चाहतेही त्याच्या या पोस्टला तुफान प्रतिसाद देत आहेत.
गोपालची प्रेयसी आणि आता झालेली पत्नी द माना नेटवर्कर्सची संस्थापक आणि सीईओ आहे. त्याव्यतिरिक्त ती बार एपिसोट्सची देखील संस्थापक आहे. गोपालची पत्नी निकिता सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. तसेत तिला बाहेर फिरणे खूप जास्त आवडते. गोपालप्रमाणेत निकितानेही तिच्या इंस्टाग्राम खात्यावरून लग्नाचे फोटो शेअर केले आहेत.
गोपाल आयपीएल २०२१ मध्ये राजस्थान रॉयल्ससाठी खेळताना दिसला होता. यावर्षी त्याला केवळ तीन सामन्यात खेळण्याची संधी मिळाली आणि यामध्ये तो एकही विकेट घेऊ शकला नाही. तसेच त्याचा संघही आयपीएलच्या प्लेऑफमध्ये पोहोचू शकला नाही. यापूर्वी गोपाल आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्ससाठी देखील खेळला आहे.
त्याने त्याच्या आयपीएल कारकिर्दीत आतापर्यंत एकूण ४८ सामने खेळले आणि त्यात २६ च्या सरासरीने ४८ विकेट्स घेतल्या आहेत. आयपीएलमध्ये त्याच्या सर्वोत्कृष्ट प्रदर्शनाचा विचार केला, तर त्याने १६ धावा देऊन चार विकेट्स घेतल्या होत्या. तसेच आयपीएलमध्ये त्याने फलंदाजीत १७१ धावा केल्या आहेत. आयपीएलचा त्याच्याकडे चांगला अनुभव आहे. त्याने उत्कृष्ट प्रदर्शन केले असले तरी, अद्याप त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळालेली नाही.