---Advertisement---

फलंदाजांनी चोपलं, गोलंदाजांनी रोखलं! राजस्थानने १५ धावांनी उडवला दिल्लीचा धुव्वा

Rajasthan-Royals
---Advertisement---

इंडियन प्रीमिअर लीग २०२२मधील ३४वा सामना शुक्रवारी (दि. २२ एप्रिल) दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स संघात पार पडला. या सामन्यात राजस्थान रॉयल्सने शानदार विजय मिळवला. राजस्थानने १५ धावांनी दिल्लीला पराभूत केले. राजस्थानच्या विजयात फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही विभागांनी मोलाचे योगदान दिले. धावांचा पाऊस पाडणाऱ्या जोस बटलरला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. (Rajasthan Royals Won By 15 Runs Against Delhi Capitals)

या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स संघाने नाणेफेक जिंकत गोलंदाजी करण्याचा निर्णय घेत राजस्थान रॉयल्सला फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. यावेळी राजस्थानने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकात २ विकेट्स गमावत २२२ धावा केल्या आणि दिल्लीला २२३ धावांचे आव्हान दिले होते. हे आव्हान पार करताना दिल्ली संघ ८ विकेट्स गमावत २०७ धावाच करू शकला. त्यामुळे दिल्लीला या हंगामातील चौथा पराभव पत्करावा लागला.

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

दिल्लीकडून फलंदाजी करताना कर्णधार रिषभ पंतने सर्वाधिक धावा केल्या. त्याने २४ चेंडूत २ षटकार आणि ४ चौकारांच्या मदतीने ४४ धावा चोपल्या. मात्र, या खेळीचा संघाला फायदा झाला नाही. पंतव्यतिरिक्त पृथ्वी शॉ आणि ललित यादवने प्रत्येकी ३७, रोवमन पॉवेलने ३६ आणि डेविड वॉर्नरने २८ धावांचे योगदान दिले. शार्दुल ठाकूरला फक्त १० धावा करता आल्या. सर्फराज खान आणि अक्षर पटेल फक्त १ धाव करून तंबूत परतले.

यावेळी राजस्थानकडून गोलंदाजी करताना प्रसिद्ध कृष्णाने सर्वाधिक विकेट्स घेतल्या. त्याने ४ षटके गोलंदाजी करताना २२ धावा देत ३ विकेट्स घेतल्या. त्याच्याव्यतिरिक्त आर अश्विनने २ विकेट्स घेतल्या. तसेच, ओबेद मॅककॉय आणि युझवेंद्र चहलने प्रत्येकी १ विकेट आपल्या खिशात घातली.

तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना राजस्थानचा सलामीवीर फलंदाज जोस बटलरने सर्वाधिक धावा केल्या. बटलरने ६५ चेंडूंचा सामना करताना ११६ धावा चोपल्या. यामध्ये ९ चौकार आणि ९ षटकारांचा समावेश होता. त्याच्यासोबतच देवदत्त पडिक्कलने ५४ धावा करत अर्धशतक साकारले आणि संजू सॅमसनने नाबाद ४६ धावांचे योगदान दिले होते. यावेळी दिल्लीकडून गोलंदाजी करताना खलील अहमद आणि मुस्तफिजूर रहमान यांनाच प्रत्येकी १ विकेट घेण्यात यश आले.

या विजयासह राजस्थान संघाने गुणतालिकेत थेट अव्वलस्थान गाठले आहे. दुसरीकडे दिल्ली संघ सहाव्या स्थानी घसरला आहे.

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा

महत्वाच्या बातम्या-

अफलातून! सर्वाधिक आयपीएल शतके करणाऱ्यांमध्ये जोस बटलरने गाठला ‘हा’ क्रमांक, डिविलियर्सलाही पछाडलं

दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध मैदानात पाय टाकताच कर्णधार सॅमसनचा भन्नाट विक्रम; बनला राजस्थानचा ‘रॉयल’ खेळाडू

गुजरातच्या खेळाडूंना झालं तरी काय? सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओत सत्य आले समोर

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---