न्यूझीलंड येथे सुरू असलेल्या महिला क्रिकेट विश्वचषक (Women’s Cricket World Cup 2022) स्पर्धेमध्ये भारतीय संघाने विजयी सलामी दिली आहे. दिग्गज फलंदाज मिताली राज हिच्या नेतृत्वात खेळणाऱ्या भारतीय संघाने परंपरागत प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा १०७ धावांनी मोठा पराभव करत आपला पहिला विजय नोंदविला (INDvPAK). पुरुष क्रिकेट प्रमाणेच भारतीय महिला संघाने आता वनडे विश्वचषकातील आजवरच्या सर्व ४ सामन्यांमध्ये पाकिस्तानला पराभूत केले आहे. भारताच्या विजयात सिंहाचा वाटा उचलणारी डावखुरी फिरकी गोलंदाज राजेश्वरी गायकवाड (Rajeshwari Gayakwad) हिने एक खास पराक्रम आपल्या नावे नोंद केला.
राजेश्वरीने नोंदविला खास पराक्रम
भारतीय फलंदाजांनी पाकिस्तानसमोर मोठी धावसंख्या पार करण्याचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानचा संघ ढेपाळला. भारताची अनुभवी डावखुरी फिरकीपटू राजेश्वरी गायकवाड हिने जबरदस्त कामगिरी केली. तिने आपल्या १० षटकांमध्ये केवळ ३१ धावा देऊन पाकिस्तान संघाच्या ४ फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. यासह ती महिला विश्वचषकात एका सामन्यात ४ पेक्षा अधिक बळी दोन वेळा मिळवणारी पहिली भारतीय गोलंदाज ठरली. तिने इंग्लंडमध्ये २०१७ साली झालेल्या विश्वचषकात न्यूझीलंड विरुद्ध १५ धावा देताना पाच फलंदाज बाद केले होते. राजेश्वरी आपल्या कारकिर्दीतील दुसरा विश्वचषक खेळत आहे.
भारतीय संघाचा दणदणीत विजय
माऊंट मॉन्गुई येथे झालेल्या या सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना स्मृती मंधाना, स्नेहा राणा व पूजा वस्त्राकार यांच्या अर्धशतकांच्या जोरावर ७ बाद २२४ अशी धावसंख्या नोंदवली होती. प्रत्युत्तरात, पाकिस्तान संघाची एकही फलंदाज दम दाखवू शकली नाही. राजेश्वरी गायकवाड, स्नेहा राणा व झुलन गोस्वामी यांच्या गोलंदाजीपुढे पाकिस्तानचा संघ १३७ धावांमध्ये सर्वबाद झाला. शानदार ६७ धावांची खेळी करणाऱ्या पुजा वस्त्राकारला सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
महत्वाच्या बातम्या-
दोन आठवडे दारूच्या थेंबालाही नव्हतं शिवलं; शेन वॉर्नच्या निधनानंतर मॅनेजरचा दावा (mahasports.in)