श्रीलंकेचे दिग्गज स्पिनर रंगना हेराथ हे बांगलादेशचे फिरकी गोलंदाजी प्रशिक्षक होऊ शकतात. ते न्यूझीलंडचे डेनियल विटोरी यांच्याजागी पदभार सांभाळू शकतात. कोरोनाच्या महामारीमुळे विटोरी नियमितपणे बांगलादेश संघासोबत राहू शकत नसल्याने हे पद रिकामे झाले आहे. या पदासाठी पाकिस्तानचे सईद अजमल आणि भारताचे साईराज बहुतुले यांसह आणखी दोन उमेदवारांनी आपले अर्ज दिले आहेत. विशेष म्हणजे हेराथ यांनी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 1000 पेक्षा जास्त बळी घेतले आहेत.
बांगलादेश क्रिकेट बोर्ड क्रिकेट ऑपरेशनचे अध्यक्ष अकरम खान यांनी क्रिकइंफोला मुलाखत देताना सांगितले की, “ते लवकरच यावर निर्णय घेणार आहेत. हेराथ हे बाकीच्या उमेदवारांपेक्षा सरस आहेत. त्यामुळे ते या पदावर रुजू होण्याची शक्यता आहे. या गोष्टीला झिम्बाब्वे दौऱ्याच्या अगोदरच पूर्णविराम देऊ.”
बांगलादेश संघ 29 जूनला झिम्बाब्वे दौऱ्यावर जाणार आहे. तिथे त्यांना एक कसोटी, तीन एकदिवसीय आणि तीन टी20 सामने खेळायचे आहेत. तत्पुर्वी त्यांना ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि न्यूझीलंडविरुद्ध घरच्या मैदानावर 14 मर्यादित षटकांचे क्रिकेट सामने खेळायचे आहेत.. हे सामने आगामी टी२० विश्वचषकाच्या दृष्टीने खूप महत्वाचे असणार आहेत.
श्रीलंकेच्या मागील बांगलादेश दौऱ्यादरम्यान सोहेल इस्लाम हे फिरकी गोलंदाजी प्रशिक्षक होते. बांगलादेशने श्रीलंकाविरुद्ध एकदिवसीय मालिकेत 2-1 ने विजय मिळवला होता. बांगलादेशसाठी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात विजय मिळवणे खूप महत्त्वाचे असणार आहे. यामुळेच शाकिब अल हसन आणि मुस्तफिजुर रहमान हे खेळाडू सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या आयपीएल 2021च्या उर्वरित सामन्यात दिसणार नाहीत. बांगलादेशने त्यांना एनओसी देऊन जाण्यास बंदी घातली आहे.
हेराथ यांनी घेतले कसोटीत 400 पेक्षा अधिक बळी
श्रीलंकेचे डावखुरे फिरकीपटू रंगना हेराथ यांनी कसोटी क्रिकेटमध्ये उत्कृष्ट प्रदर्शन केले आहे. त्यांनी कसोटीमध्ये 93 सामन्यात 433 बळी घेतले होते. दरम्यान 34 वेळा एकाच सामन्यात 5 बळी आणि 9 वेळा 10 बळी घेण्याच्या विक्रम केला होता. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये हेराथ यांनी 270 सामन्यात 1080 बळी घेतले होते. यात 70 वेळा 5 बळी घेण्याचा पराक्रम केला होता. याबरोबरच त्यांनी 71 एकदिवसीय सामन्यात 74 आणि 17 टी20 सामन्यात 18 बळी घेतल्या होत्या. त्यांनी 2018 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती.
महत्त्वाच्या बातम्या-
प्रत्येक आंतरराष्ट्रीय शतक षटकार मारुनच पूर्ण केलेले खेळाडू, दोन्ही आहेत भारतीय
सचिन तेंडुलकरला सर्वाधिक अडचणीत आणणारा गोलंदाज, विमान अपघातात झाला होता दुर्दैवी मृत्यू