योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली उत्तर प्रदेशात स्थापन झालेल्या जंबो मंत्रिमंडळात मोहसिन रजा या माजी रणजीपटूला स्थान देण्यात आले आहे. विशेष म्हणजे मोहसिन रजा हा एकमेव मुस्लिम चेहरा योगी आदित्यनाथ यांच्या मंत्रिमंडळात आहे. मोहसिन रजा हे उत्तर प्रदेश संघाकडून रणजीचे सामने खेळले आहेत.
प्रसिद्ध क्रिकेट वेबसाईट क्रिकइन्फो वरील माहितीनुसार ते २ रणजी सामने उत्तर प्रदेशसाठी खेळले आहेत. एमआरएफ पेस फॉउंडेशनमध्ये प्रशिक्षण घेतलेले रजा यांनी आपल्या खेळाची सुरुवात उत्तर प्रदेश संघाकडून केली. लखनऊच्या सामाजिक वर्तुळात रजा यांचं मोठं नाव आहे. आधी काँग्रेस मध्ये असणाऱ्या रजा यांनी २०१३-१४ साली भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. गेली ३-४ वर्ष उत्तर प्रदेश भाजपच्या प्रवक्ते पदाची जबाबदारी ते पार पाडत आहेत.
योगी आदित्यनाथ यांच्या मंत्रिमंडळात मोहसिन रजा यांच्या बरोबरच चेतन चौहान ह्या आणखी एक भारताच्या मोठ्या माजी क्रिकेटपटूला संधी देण्यात आली आहे. राज्यपाल राम नाईक यांनी या दोन खेळाडू असलेल्या मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. सध्या क्रिकेटपटू मोठ्या प्रमाणावर राजकारणात येत आहेत. रजा आणि चौहान यांच्याप्रमाणेच पंजाबमध्ये मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या मंत्रिमंडळात माजी क्रिकेटपटू आणि समालोचक नवज्योतसिंग सिद्धू यांना स्थान देण्यात आले आहेत.
भारतीय क्रीडाविश्व आणि सिनेसृष्टी यांना कायमच राजकारणाची भुरळ पडली आहे. याआधीही कीर्ती आझाद, मोहम्मद अझरुद्दीन, मोहम्मद कैफ, तेजस्वी यादव, मन्सूर अली खान पतौडी यांनी वेगवेगळ्या पक्षांकडून निवडणुका लढवल्या आहेत आणि आपापल्या पक्षांत वेगवेगळ्या जबाबदाऱ्याही पार पडल्या आहेत.