देशांतर्गत क्रिकेटमधील महत्वाची रणजी ट्रॉफी (ranji trophy) स्पर्धा गुरुवारी (१७ डिसेंबर) सुरू झाली. भारतीय संघाचा एकेकाळचा महत्वाचा वेगवान गोलंदाज एस श्रीसंत (s sreesanth) याने रणजी ट्रॉफीत मोठ्या काळानंतर पुनरागमन केले आणि या सामन्याचा पहिला दिवस त्याच्यासाठी खास राहिला आहे. केरळ आणि मेघालय यांच्यातील सामना स्पर्धेच्या पहिल्या दिवशी सुरू झाला. पहिल्याच दिवशी श्रीसंतला दोन विकेट्स मिळाल्या आहेत.
एस श्रीसंत देशांतर्गत क्रिकेटमध्ये केरळ संघाचे प्रतिनिधित्व करत आहे. मेघालयविरुद्धच्या या सामन्यात श्रीसंतने पहिल्या डावात २ विकेट्स घेतल्या. ही कामगिरी श्रीसंतच्या चाहत्यांसाठी, तसेच स्वतः त्याच्यासाठी खास आहे. कारण, तो तब्बल ९ वर्षांनंतर प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये एखादी विकेट घेऊ शकला आहे. श्रीसंतने यापूर्वी २०१३ मध्ये त्याची शेवटीच प्रथमश्रेणी विकेट घेतली होती. इरानी कपमधील या सामन्यात तो रेस्ट ऑफ इंडियासाठी खेळला होता. त्यावेळी मुंबई संघासाठी खेळणाऱ्या दिग्गज वसीम जाफरला त्याने तंबूत माघारी पाठवले होते.
वसीमची ही विकेट घेतल्यानंतर श्रीसंत बरेच दिवस क्रिकेटपासून दूर राहिला. त्यानंतर श्रीसंत आयपीएल २०१३ मध्ये स्पॉट फिक्सिंग प्रकरणात अडकला आणि त्याच्यावर बंदी घातली गेली. श्रीसंत त्यानंतर ७ वर्ष देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळू शकला नाही. २०२० मध्ये त्याने विजय हजारे ट्रॉफी आणि सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमधून देशांतर्गत क्रिकेटमध्ये पुनरागमन केले. मागच्या वर्षी कोरोनामुळे रणजी ट्रॉफी स्पर्धा आयोजित केली गेली नसल्यामुळे त्याला रणजी क्रिकेटमध्ये पुनरागमनासाठी अधिक वाट पाहावी लागली होती.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या आयपीएल मेगा लिलावासाठी श्रीसंतने स्वतःचे नाव नोंदवले होते. परंतु मेगा लिलावात प्रत्यक्ष त्याचे नाव पुकारले गेले नाही. त्याच्याविषयी अधिक काही माहितीही समोर येऊ शकलेली नाहीय. लिलावात जरी त्याचे नाव घेतले गेले नसले, तरी रणजी ट्रॉफीत चांगले प्रदर्शन करून श्रीसंत पुन्हा चर्चेत येऊ शकतो.
महत्वाच्या बातम्या –
काय भारी योगायोग आहे! युवा विश्वविजेते ते पदार्पणातील शतक, धूल आणि शॉ यांच्यात आढळले ‘हे’ साम्य
नवी आयसीसी क्रमवारी| विराट-बाबरसह हेजलवूडही ‘त्या’ खास यादीत सामील
आरसीबीचा हात धरल्यानंतर दिनेश कार्तिकची केकेआरसीठी भावनिक पोस्ट, वाचा सविस्तर